कोरोना संसर्ग होऊन मृत्युमुखी पडलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या वारसांना शासनाकडून ५० लाख रुपये आर्थिक मदत देण्यात यावी, अशी आग्रही मागणी परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांना नुकतीच केली होती. मात्र त्यांचे हे पत्र फक्त दिशाभूल आहे का, असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे. आज विम्यासाठी जर पैसे द्यायचे झाले तर जवळपास १०० कोटी प्रशासनाला द्यावे लागतील. फक्त एका विभागाला इतके पैसे मदत आणि पुनर्वसन विभाग कसं काय देऊ शकतो. जरी कोरोना ही आपत्ती असली, तरी एकट्या एसटी विभागाला मदत आणि पुनर्वसन विभाग १०० कोटी इतकी विम्याची रक्कम कशी काय देऊ शकणार, हा खरा कळीचा मुद्दा असून, हे पत्र म्हणजे परिवहन मंत्र्यांनी एसटी कर्मचाऱ्यांची केलेली दिशाभूल तर नाही ना, असा सवाल आता काही अधिकारी दबक्या आवाजात विचारू लागले आहेत.
थेट शासनाकडे निधी का नाही मागितला?
परिवहन मंत्र्यांनी मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे विम्याच्या रक्कमेसाठी पत्र पाठवले त्याचा काय उपयोग होणार आहे. त्यांनी त्या ऐवजी थेट अर्थ विभाग आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निधीची का मागणी केली नाही, असा सवाल आता काही जण विचारू लागले आहेत. हिंदुस्थान पोस्टचे प्रतिनिधी काही संघटनांशी बोलले असता, त्यांनी ही फक्त दिशाभूल असून, यामध्ये काहीतरी राजकीय हेतू असल्याचे म्हटले आहे. विजय वडेट्टीवार हे काँग्रेसचे नेते आहेत आणि त्यांच्याकडे मदत आणि पुनर्वसन खाते आहे. जर मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना मदत मिळाली नाही, तर आम्ही मदत आणि पुनर्वसन मंत्र्यांना पत्र लिहिले असे सांगून हात तर झटकले जाणार नाहीत, ना असा सवाल देखील आता संघटना उपस्थित करू लागल्या आहेत.
(हेही वाचाः कोरोनाने मृत्यु झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या वारसांना ५० लाख रुपये द्या! परिवहन मंत्र्यांची मागणी )
हे तर उशिरा सुचलेले शहाणपण
सगळ्यात महत्वाचे म्हणजे परिवहन मंत्री अनिल परब यांनी महामंडळाचे अध्यक्षपद आणि परिवहन मंत्रीपद स्वीकारल्यानंतर कामगारांच्या प्रश्नांवर फक्त एकदाच बैठक घेतल्याचे सांगण्यात येत असल्याचे हिंदुस्थान पोस्टने आपल्या बातमीत म्हटले होते. त्यानंतर आता विम्याच्या वेतनासाठी आणि नंतर लसीकरणासाठी दोन पत्रे अनिल परब यांनी लिहिली आहेत. त्यामुळे अनिल परब यांना हे उशिरा सुचलेले शहाणपण नाही ना, असे देखील या निमित्ताने म्हटले जात आहे.
(हेही वाचाः २१० एसटी कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर परिवहन मंत्री म्हणतात, आता लस द्या! )
ही ‘दोन’ पत्रे परबांनी लिहिली
टाळेबंदीच्या काळात राज्यभरातील अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांची वाहतूक करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना देखील फ्रंट लाईन वर्कर(कोविड योद्धे) समजून लसीकरणात प्राधान्य द्यावे, अशी विनंती परिवहन मंत्री अनिल परब यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे केली. तर कोरोना संसर्ग होऊन मृत्युमुखी पडलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या वारसांना शासनाकडून ५० लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात यावी, अशी आग्रही मागणी त्यांनी मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांना नुकतीच केली होती.
(हेही वाचाः मे महिन्यापासून एसटी कर्मचाऱ्यांना ‘नो पेमेंट’?)
Join Our WhatsApp Communityएसटी कर्मचाऱ्यांनी जिवाची बाजी लावून अत्यावश्यक सेवेतीतील कर्मचारी, डॉक्टर, नर्स, परप्रांतियांची वाहतूक, मजूर वाहतूक केली आहे. या मध्ये आमच्या अंदाजे २१२ कर्मचाऱ्यांना जीव गमवावा लागला आहे. ९ हजार कर्मचारी कोरोनाबाधित झाले आहेत. त्यामुळे निधी कसा व कुठून उपलब्ध करायचा हे एसटी व्यवस्थापनाचे काम आहे. मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना ५० लाख मिळालेच पाहिजेत, एवढीच आमची मागणी आहे व त्यावर आम्ही ठाम आहोत.
-श्रीरंग बरगे, सरचिटणीस, महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस