पाकिस्तानातील ‘काझी’ भारतात बनले ‘पद्मश्री’!

कर्नल काझी सज्जाद अली झहीर उच्चभ्रू 14 पॅरा ब्रिगेडचा एक भाग होते, पण पूर्व पाकिस्तानमध्ये होणाऱ्या अत्याचारांनी त्यांना हादरवून सोडले.

86

राष्ट्रपती भवनात मंगळवारी पद्म पुरस्कारांचे वितरण झाले. या सोहळ्यात अनेक क्षेत्रांत मोलाच योगदान दिलेल्या व्यक्तींचा सन्मान करण्यात आला. त्यात एका विशेष व्यक्तीचा सन्मान करण्यात आला आहे. 70 वर्षीय कर्नल झहीर यांना 2021 या वर्षासाठी भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी एक पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. पाकिस्तानी सैन्यात कर्नल पदावर राहिलेल्या काझी सज्जाद अली झहीर यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी पद्मश्री पुरस्काराने गौरवले. कर्नल झहीर यांनी पाकिस्तानी लष्करातील अनेक गुप्त कागदपत्रे, दस्तावेज भारताला सोपवले होते. बांगलादेश मुक्ती वाहिनीच्या हजारो तरुणांना शस्त्र चालवण्याचे प्रशिक्षण त्यांनी दिले होते. त्यामुळे संतापलेल्या पाकिस्तान सरकारने त्यांना फाशीची शिक्षा देण्याची ऑर्डर काढली होती, ती आजही त्यांच्या नावावर आहे. तब्बल 50 वर्षे पाकिस्तानी सरकार कर्नल झहीर यांना शोधत आहे.

पुरस्कारानंतर काय म्हणाले कर्नल?

पाकिस्तानच्या युद्ध योजनांवर जे काही जमवता येईल ते सोबत खिशात फक्त २० रुपये घेऊन आणि पॅन्ट-शर्ट घालून पळून आलो. पाकिस्तानी सैन्यात अधिकारी होण्यापासून ते पूर्व पाकिस्तानला मुक्त करण्यासाठी प्रमुख व्यक्ती बनण्यापर्यंत माझा हा प्रवास मला आठवला. असे १९७१ च्या मुक्तिसंग्रामातील नायक कर्नल काझी सज्जाद अली झहीर यांनी सांगितले. प्रत्येक पुरस्कार हा मैलाचा दगड असतो, पण पद्मश्री माझ्यासाठी खास आहे, कारण त्यात बांगलादेश मुक्तिसंग्रामाची भावना जपलेली आहे, असे कर्नल झहीर यांनी ढाका येथील ‘द प्रिंट’ला सांगितले. ते म्हणाले, ‘पाकिस्तानी लष्कराकडून माझ्याविरुद्ध फाशीचे वॉरंट जारी करण्यात आले, ही माझ्यासाठी सन्मानाची बाब आहे. पाकिस्तानमुळे माझ्या कुटुंबाला खूप त्रास सहन करावा लागला आहे. माझ्या वडिलांचे ढाक्यातील छोटेसे घर जळून खाक झाले. माझी आई आणि बहीण यांनी घर सोडल्यानंतर पाकिस्तानी सैनिकांनी त्यांना सुरक्षित निवारा मिळेपर्यंत त्यांचा पाठलाग केला होता.

कोण आहेत कर्नल काझी झहीर?

कर्नल झहीर 1969 च्या उत्तरार्धात पाकिस्तानी सैन्यात दाखल झाले होते आणि त्यांची आर्टिलरी कॉर्प्समध्ये नियुक्ती झाली. मात्र, पूर्व पाकिस्तानात जो आताचा बांगलादेश आहे, तिथे पाकिस्तानी लष्कराकडून होत असलेले अत्याचार पाहून ते देश सोडून भारतात पोहोचले. कर्नल झहीर उच्चभ्रू 14 पॅरा ब्रिगेडचा एक भाग होते, पण पूर्व पाकिस्तानमध्ये होणाऱ्या अत्याचारांनी त्यांना हादरवून सोडले. त्याच क्षणी त्यांनी देश सोडून पळून जाण्याचा निर्णय घेतला आणि सांबा बॉर्डरमार्गे जम्मू-काश्मीरला पोहोचले. त्यावेळी त्यांच्याकडे फक्त 20 रुपये होते आणि एकच पॅन्ट-शर्ट होता. पण पाकिस्तानच्या युद्ध योजनांवर त्यांनी जेवढे शक्य होतील तेवढे पुरावे त्यांनी आणले आणि भारतीय लष्कराशी संपर्क प्रस्थापित केला.

मला वाटते मी चांगला लढलो!

भारताशी हातमिळवणी केल्यानंतर, कर्नल झहीर यांनी मुक्ती संग्रामाच्या प्रशिक्षणात महत्त्वाची भूमिका बजावली, ज्यात पूर्व पाकिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी लढणारे बांगलादेशी सैनिक, निमलष्करी आणि इतर नागरिकांचा समावेश होता. त्यांनी सिल्हेट परिसरात तोफखान्याचीही व्यवस्था केली. भारताने पूर्व पाकिस्तानला स्वातंत्र्यप्राप्तीसाठी दिलेल्या लढ्यात लढण्यासाठी सहा 105 मिमी तोफखान्यासह फील्ड आर्टिलरी बॅटरी दिली होती. यात कर्नल झहीर सह-कॅप्टन होते. त्यामुळे मी या लढ्यात चांगला लढलो असे मला वाटते, असे काझी म्हणाले.

बांगलादेशच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित

1971 च्या युद्धात बांगलादेशी आणि भारतीय नागरिक आणि लष्करी जवानांच्या योगदानावर दस्तऐवज तयार करण्यातही त्यांनी प्रमुख भूमिका बजावली आहे. त्यांनी 54 पुस्तके लिहिली आहेत. भारतीय लष्कराच्या थिंक टँकचा संदर्भ देताना ते म्हणाले, आम्ही भारताच्या माजी सैनिकांसोबत दोन पुस्तके लिहिली आहेत आणि आता तिसरे पुस्तके लिहिणार आहे, ज्याचे शीर्षक द वॉर वी फॅाट टुगेदर आहे. त्यांना 2013 मध्ये बांगलादेशचा सर्वोच्च नागरी पुरस्कार, स्वाधीनता पदक प्रदान करण्यात आला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.