गणेशोत्सवाप्रमाणे नवरात्रौत्सवातही भाजप करणार शिवसेनेची कोंडी

मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मागील गणेशोत्सवामध्ये बहुतांशी मंडळांना जाहिरातबाजी करत मतदारांपर्यंत पक्षाच्या नेत्यांची ओळख पटवण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाजपने आता येत्या नवरात्रोत्सवातही गणेशोत्सव पॅटर्नच राबवण्याचा निर्धार केला आहे. येत्या नवरात्रौत्सवात सर्व मंडळांना आर्थिक हातभार लावून भाजपची जाहिरात बाजी करण्यात येणार असून यासाठी सर्व मंडळांना आधीच भाजपने गाठून त्यांना प्रवेशद्वाराच्या जाहिराती देण्यास सुरुवात केल्या आहेत. तर जिथे भाजपची जाहिरात नसेल तिथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटाच्या जाहिराती झळताना दिसणार असून पुन्हा एकदा गणेशोत्सवाप्रमाणे नवरात्रौत्सवातही भाजप शिंवसेनेची कोंडी करणार असल्याचे बोलले जात आहे.

( हेही वाचा : २०२३ अखेर कोस्टल रोड पूर्ण होणार, मुख्यमंत्र्यांचा विश्वास)

नवरात्रौत्सवातही तोच पॅटर्न

मुंबई महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवामध्ये भाजपच्यावतीनेक शुभेच्छा देणारे फलक तसेच प्रवेशद्वाराच्या माध्यमतून जाहिरात देत संपूर्ण मुंबईमध्ये भाजपने जाहिरातबाजी केली होती. गणेशोत्सवांमध्ये भाजपने सर्व मंडळांना चांगल्याप्रकारे देणगी स्वरुपात आर्थिक स्वरुपाचा हातभार लावल्याने मंडळांनाही उत्सव चांगल्याप्रकारे थाटामाटात साजरा करता आला. त्यामुळे गणेशोत्सवात ज्याप्रकारे मंडळांच्या माध्यमातून भाजपच्या जाहिरातबाजीला मिळालेल्या चांगल्या प्रतिसादानंतर येत्या नवरात्रौत्सवातही हा पॅटर्न रावबण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे.

प्रवेशद्वाराच्या माध्यमातून जाहिरातबाजी

नवरात्रौत्सवातील गरबा हा गुजराती बांधवांचा असला तरी आता मराठी वस्त्यांसह इतर वस्त्यांमध्ये मोठ्याप्रमाणात देवी माँ च्या मूर्तींची प्रतिष्ठापना तसेच फोटो लावून रास गरबा किंवा दांडीया खेळला जातो. एकेकाळी गुजराती समाजाचा असलेला हा उत्सव आता सर्व समाजांमध्ये तेवढ्याच आनंदाने आणि भक्तीभावाने साजरा केला जात असल्याने यासाठी सर्व मंडळांना बॅनर, फलक तसेच प्रवेशद्वाराच्या माध्यमातून जाहिरातबाजी केली जाणार आहे. यासाठी प्रत्येक मंडळांना भाजपकडून जाहिराती दिल्या जात असून गणेशोत्सवानंतर पुन्हा एकदा नवरात्रौत्सवात भाजपचीच जाहिरातीबाजी पहायला मिळणार आहे. त्यामुळे एकप्रकारे गणेशौत्सवाप्रमाणेच नवरात्रौत्सवातही जाहिरातींमध्ये कुठेही जागा शिल्लक न ठेवण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचेही बोलले जात आहे. त्यामुळे मुंबईतील अनेक मंडळांमध्ये भाजपसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचाच जाहिराती झळकताना पाहायला मिळणार आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here