राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या नियुक्तीसाठी शिंदे-फडणवीस सरकारची यादी तयार?शिंदे गटातून यांना मिळणार संधी

139

ठाकरे सरकारच्या काळापासून राज्याच्या विधान परिषदेतील राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची नियुक्ती ही प्रलंबित आहे. नव्याने स्थापन झालेल्या शिंदे-फडणवीस सरकारकडून मात्र 12 आमदारांच्या नावांची यादी तयार झाल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे लवकरच या यादीतील नावे जाहीर करण्यात येतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. यामध्ये भाजपला 8 तर शिंदे गटाला 4 जागा मिळणार असल्याचे बोलले जात आहे.

विधान परिषदेतील राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या यादीवर शिंदे-फडणवीस सरकारमध्ये एकमत झाल्याचे राजकीय सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या आणि शिंदे-फडणवीस सरकारच्या समर्थकांची या यादीत वर्णी लागणार असल्याची शक्यता आहे.

लवकरच यादी जाहीर होणार

या राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या नावांवरुन जोरदार रस्सीखेच सुरू होती. पण आता ही यादी सरकारकडून तयार करण्यात आली असून लवकरच ती राज्यपालांकडे परवानगीसाठी पाठवण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. शिंदे गटाकडून शिवसेनेतील जुन्या-जाणत्या नेत्यांना राज्यपाल नियुक्त आमदार बनवण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.

शिंदे गटाकडून ही नावे चर्चेत

या 12 आमदारांपैकी 4 जागा शिंदे गटाला देण्यात येतील असे सांगण्यात येत आहे. यामध्ये माजी आमदार राजेश क्षीरसागर, माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम,विजय शिवतारे,माजी खासदार आनंदराव अडसूळ किंवा माजी आमदार अभिजीत अडसूळ, माजी मंत्री अर्जुन खोतकर,ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के, माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांची नावे चर्चेत असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे या नेत्यांपैकी नेमकी कोणाची वर्णी राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीत लागणार हे पाहणे महत्वाचे आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.