अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिर ( Ayodhya Ram Mandir) प्राणप्रतिष्ठा सोहळा २२ जानेवारीला होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते रामललाची मंदिरात प्राणप्रतिष्ठा होईल. त्यासाठी, देशभरातील अनेक मान्यवरांना विशेष निमंत्रण देण्यात आले आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनाही सोहळ्याचं निमंत्रण गेले असून तेही उपस्थित राहणार आहेत.
अवघ्या देशाचे लक्ष लागलेल्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी तब्बल ११ हजार व्हीआयपींना बोलावण्यात आले आहे. त्यामध्ये, राजकीय नेते, उद्योगपती, सेलिब्रिटी, क्रिकेटर्सं आणि कारसेवकांचा समावेश आहे. आता, सरसंघचालक मोहन भागवत यांनाही विशेष निमंत्रण देण्यात आले आहे. तर, राम मंदिर ( Ayodhya Ram Mandir) उभारणीच्या लढ्यातील खंदे कार्यकर्ते असलेल्या लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी हेही सोहळ्यासाठी अयोध्येत उपस्थित राहणार आहेत. या दोन्ही नेत्यांसाठी विषेश व्यवस्था करण्यात येणार असून त्यांच्या सुरक्षेसाठीही विशेष यंत्रणा तैनात असणार आहे. या दोन्ही दिग्गज नेत्यांना यापूर्वीच निमंत्रण पत्र पाठवण्यात आले होते. मात्र, बुधवारी विश्व हिंदू परिषदेच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांची भेट घेऊन त्यांना सोहळ्याचे निमंत्रण दिले. यावेळी, दोन्ही नेत्यांनी सोहळ्याला उपस्थित राहणार असल्याचे सांगितले. यापूर्वी काही नेत्यांच्या विधानामुळे राम मंदिर उभारणीच्या आंदोलनात महत्त्वाची भूमिका निभावणारे हे दोन्ही नेते सोहळ्याला उपस्थित राहणार नसल्याची चर्चा होती.
Join Our WhatsApp Community