सध्या आपण सगळेच सुरु करत नाही, टप्प्याटप्याने आपण काही गोष्टी सुरु करत आहोत, मुंबई लोकल मात्र सर्वसामान्यांसाठी सुरु करण्यासाठी अद्याप निर्णय घेण्यात आला नाही, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. सांगली परिसरातील पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सांगली येथे आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
कार्यालयांचे काम शिफ्टने करा!
मुंबईतील खासगी कार्यालयांनीही गर्दी होणार नाही, एकाच वेळी सर्व कर्मचारी कार्यालयात राहणार नाही, अशा प्रकारचे वेळापत्रक ठरवावे, शिफ्टने काम करून घ्यावे, तसेच शक्य असेल तर ‘वर्क फ्रॉम होम’साठी बॅचेस बनवाव्यात. १५ दिवस अमुक एक बॅचला वर्क फ्रॉम होम करू द्यावे, १५ दिवस दुसऱ्या बॅचला वर्क फ्रॉम होम करू द्यावे, तसेच मोठ्या उद्योगांनी कामगारांना कंपनीच्या जवळच निवासाची सोय करावी, त्यासाठी सरकारही मदत करायला तयार आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
(हेही वाचा : सांगलीत राडा! मुख्यमंत्र्यांसमोर नेमके काय घडले?)
दुकाने ८ वाजेपर्यंत खुली करणार!
‘दुकानाच्या वेळा वाढवून द्या, अन्यथा दुकाने उघडू’, असा व्यापाऱ्यांनी इशारा दिला आहे. त्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारण्यात आला, त्यावर मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट उत्तर दिले की, अशा धमक्यांना मी मनावर घेत नाही. कारण, माझ्यासमोर माझ्या नागरिकांच्या जीवाची चिंता आहे. मी व्यापाऱ्यांचे दु:ख, वेदना समजू शकतो, पण त्यावेळेला कुठलेही ऑक्सिजनचे दुकान उघडे नव्हते. नागरिकांचे जीव वाचवणे हे महत्त्वाचे आहे, त्यामुळे मला ही काळजी घ्यावी लागते. पुढच्या लाटेत दुसऱ्या लाटेपेक्षा दुप्पटीने ऑक्सिजन लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे, कोविड नियमांचे पालन बंधनकारक आहे. आज आपण एक आदेश काढत आहोत, दुकानाच्या वेळा रात्री ८ पर्यंत करणार आहोत. मात्र, ज्या जिल्ह्यात रुग्णसंख्या कमी होत नाही, तिथे रुग्णसंख्या जास्त आहे, तिथे पूर्वीचेच नियम व बंधन लागू राहतील, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केले.
Join Our WhatsApp Community