मी राज्यात आज लॉकडाऊन जाहीर करत नसलो तरी लॉकडाऊनचा आज इशारा देत आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी फेसबूक लाइव्हच्या माध्यमातून सांगितले. त्यानंतर आता ठाकरे सरकारने लॉकडाऊनच्या दिशेने पाऊल टाकायला सुरुवात केली आहे. राज्यात निर्बंध लावले तरी लोक ऐकणार नसल्याने लॉकडाऊन हाच पर्याय ठाकरे सरकार समोर उरला असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील कडक लॉकडाऊनच्याच विचारात असल्याची माहिती खात्रीलायक सुत्रांकडून मिळत आहे. एवढेच नाही तर मुख्यमंत्री आज किंवा उद्या याबाबत अधिकृत घोषणा करतील, असे देखील सूत्रांनी सांगितले.
आधी आठवड्याभरासाठी होणार लॉकडाऊन?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीला आठवड्याभराच्या लॉकडाऊनची घोषणा होऊ शकते. त्यानंतर कोरोना रुग्णांची आकडेवारी बघून पुन्हा लॉकडाऊन करायचे की, इतर पर्याय निवडायचा याचा विचार होऊ शकतो. मात्र आता तरी आठवड्याभरासाठी लॉकडाऊन करायचे असा विचार ठाकरे सरकारचा झाल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने हिंदुस्थान पोस्टशी बोलताना सांगितले. एवढेच नाही तर हे आठवड्याभराचे लॉकडाऊन संपूर्ण राज्यात असले तरी ज्या शहरी भागात सर्वाधिक रुग्ण सापडत आहेत त्याठिकाणी नियम अधिक कठोर केले जाणार असल्याचे देखील समजत आहे.
(हेही वाचाः माहीमचे शोभा हॉटेल सील, ११ कामगार कोरोना बाधित)
कॅबिनेट बैठकीत होणार शिक्कामोर्तब
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कालपासून विविध क्षेत्रातील लोकांशी बोलत असून, आज ते चित्रपट-मालिका निर्मात्यांसोबत आणि प्रमुख उद्योजकांसोबत बोलणार आहेत. त्यानंतर दुपारी 3 वाजता मुख्यमंत्र्यांनी कॅबिनेट बैठक बोलावली असून, या बैठकीत सर्व मंत्र्यांसोबत बोलून मुख्यमंत्री लॉकाडाऊनची घोषणा करणार असल्याचे समजते. एवढेच नाही तर खाजगी कंपन्यांना वर्क फ्रॉम होम हे बंधनकारक केले जाणार असे देखील समजत आहे.
म्हणून मुख्यमंत्र्यांसमोर लॉकडाऊन हा एकमेव पर्याय
राज्य सरकारने काही भागांमध्ये कठोर निर्बंध लादून कोरोनाची साथ रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र लोक ऐकत नाहीत. त्याऐवजी राज्यात एकदम बंद करुन हळूहळू सेवा सुरू केल्यास त्याचा फायदा होतो, हा माझा अनुभव असल्याचे सूचक वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संपादकांच्या बैठकीत शनिवारी केले होते. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे लॉकडाऊन लावण्याच्या निर्णयापर्यंत जवळपास आले असून, लवकरच ते याची अधिकृत घोषणा करणार आहेत.
(हेही वाचाः मला कुणाचीही रोजी रोटी हिरावून घ्यायची नाही, पण…! मुख्यमंत्र्यांची भावना )
बारामतीत दादांचे लॉकडाऊनचे संकेत
सद्यस्थितीत बारामती तालुक्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढतच आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात न आल्यास लॉकडाऊनचा विचार करावा लागेल. असे संकेत उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. ज्या ठिकाणी कोरोनाचे रुग्ण जास्त आहेत त्या ठिकाणी हॉटस्पॉट घोषित करा. बारामती शहरात काही नागरिक मास्क वापरताना दिसत नाहीत. कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करताना दिसत नाहीत. बाजाराच्या ठिकाणी गर्दी करत आहेत. यावर प्रशासनाने कडक उपाययोजना करुन दंडात्मक कारवाई करावी. सार्वजनिक ठिकाणी तसेच अन्यत्र गर्दी होणार नाही आणि सुरक्षित अंतर राखले जाईल, याची सर्वांनीच दक्षता घेणे आवश्यक आहे. लग्नसमारंभ आणि अन्य कार्यक्रमासाठी नियमानुसार लोकांची संख्या मर्यादित ठेवणे अपेक्षित आहे, याकडे विशेष लक्ष द्यावे. असेही त्यांनी सांगितले.
Join Our WhatsApp Community