लॉकडाऊन की कठोर निर्बंध, अधिकारी-मंत्र्यांमध्ये मतभेद! काय करणार मुख्यमंत्री?

मुख्य सचिव, आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांकडून राज्यात लॉकडाऊन लावण्याशिवाय पर्याय नसल्याचे सांगण्यात येत आहे, तर लॉकडाऊन करण्याला काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचा विरोध आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री नेमकं कुणाचं ऐकणार हा खरा प्रश्न आहे.

102

राज्यात सध्या कोरोनाचे आकडे दिवसेंदिवस वाढत असून, राज्यात काल एकाच दिवसात 43 हजार 183 नविन कोरोना रुग्ण सापडले. तर 249 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यात आता लॉकडाऊन करायचे की, कठोर निर्बंध लादायचे या पेचात ठाकरे सरकार आहे. पण असे असतानाच मुख्य सचिव, आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांकडून राज्यात लॉकडाऊन लावण्याशिवाय पर्याय नसल्याचे सांगण्यात येत आहे, तर लॉकडाऊन करण्याला काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचा विरोध आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री नेमकं कुणाचं ऐकणार हा खरा प्रश्न आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादीचा लॉकडाऊनला विरोध

कोरोना रुग्ण वाढत असताना लॉकडाऊन नको अशीच भूमिका ठाकरे सरकारमधील मंत्र्यांची आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीने लॉकडाऊनला विरोध दर्शवला असून, काही मंत्र्यांनी लॉकडाऊन ऐवजी राज्यात कठोर निर्बंध घालण्यात यावेत, असे मुख्यमंत्र्यांना सांगितले. आधीच मागील वर्षी लॉकडाऊनमुळे सर्वसामान्यांचे रोजगार गेले. त्यातच लॉकडाऊनचा फटका राज्याच्या आर्थिक तिजोरीला बसला आहे. याचमुळे लॉकडाऊन करू नये, असे लोकप्रतिनिधींचे मत आहे.

राज्यात कोरोनाची संख्या झपाट्याने वाढत असल्याने लॉकडाऊनचा विचार आला आहे. पण लॉकडाऊन हा अंतिम पर्याय होऊ शकत नाही. तसा आग्रहच आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना करण्यात आला आहे.

-नवाब मलिक, अल्पसंख्यांक मंत्री

आज संध्याकाळी मुख्यमंत्र्यांची बैठक

एकीकडे प्रशासन आणि मंत्र्यांमध्ये वेगवेगळी मते असली तरी राज्यातील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आज संध्याकाळी साडेचार वाजता वर्षावर बैठक बोलावली आहे. या बैठकीत मुख्यमंत्री राज्यात पुन्हा एकदा कठोर निर्बंध लावण्याबद्दल निर्णय घेऊ शकतात, अशी माहिती मिळत आहे. आज संध्याकाळी 8 वाजता मुख्यमंत्री फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधणार अशी माहिती मिळत आहे.



लॉकडाऊन सामान्य जनतेला परवडणार नाही. निर्बंध लागतील पण लॉकडाऊन नाही. रुग्णसंख्या वाढत असली तरी बेड कसे वाढतील याकडे लक्ष आहे.

-विजय वडेट्टीवार, मदत आणि पुर्नवसन मंत्री

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.