सध्या सर्वच राजकीय पक्ष हे लोकसभा निवडणुकीची तयारी करू लागले आहेत. त्यातच अनेकजण आपल्याला उमेदवारी कशी मिळेल याकरता फिल्डिंग लावत आहेत. अशा वेळी राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांची उमेदवारी निश्चित झाली असल्याचे समजते.
वरळीत विविध कार्यक्रमांचे आयोजन
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीनंतर राष्ट्रवादीचे नेतृत्व अजित पवार आणि शिवसेनेचे नेतृत्व एकनाथ शिंदे यांना देण्याचा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी दिला आहे. त्यांच्या या निणर्यामुळे अवघ्या राजकीय पातळीवर सकारात्मक आणि नकारात्मक प्रतिक्रिया उमटू लागल्या. आता हे नार्वेकर लोकसभा निवडणुकीसाठी इच्छूक आहेत. त्यासाठी त्यांना भाजपने दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचे आदेश दिल्याचे समजते. दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून सध्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अरविंद सावंत हे खासदार आहेत. शिवसेनेतील फुटीनंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पक्षाने महायुतीत सामील होण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे हा मतदारसंघ महायुतीत कोणाला मिळणार, याबाबत तर्क-वितर्क लढवले जात होते. मात्र ही जागा आपल्यालाच मिळावी, यासाठी भाजप आग्रही असल्याची माहिती आहे. तसेच भाजपकडून राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांना लोकसभा निवडणुकीसाठी मैदानात उतरण्याच्या सूचनाही देण्यात आल्याचे बोलले आहे. त्यादृष्टीने नार्वेकर यांनी तयारी सुरू केली आहे. आज आणि उद्या नार्वेकर यांच्या उपस्थितीत वरळीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
Join Our WhatsApp Community