Lok Sabha Election 2024: निवडणूक प्रचाराचा स्तर घसरला?

100
Minority Votes : अल्पसंख्यांक मतांसाठी महायुती सरकारकडून ‘मार्टी’ ची स्थापना
  • सुजित महामुलकर

गेले महिनाभर लोकसभा २०२४ निवडणुकीने राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. विविध राजकीय पक्षांकडून प्रचारात विरोधकांसाठी वापरले जाणारे शब्द आणि टीका याचा स्तर किती घसरला आणि अजून किती घसरणे बाकी आहे? या विषयावर उद्या खरंच जर कुणी पी.एचडी. करण्यासाठी संशोधन आणि प्रबंध लिहिला तर नवल वाटू नये. (Lok Sabha Election 2024)

२०१४ पासून वैयक्तिक टीका
देशाचा विचार करता २०१४ पासून वैयक्तिक टीका-टिप्पणीत अधिक भर पडल्याचे सर्वसामान्य लोकही मान्य करतील. याचा सरळ अर्थ काढायचा तर देशात मोदी सरकार स्थापन झाल्यानंतर किंवा दुसरा अर्थ कॉँग्रेस सत्तेवरुन पायउतार झाल्यापासून हा स्तर घसरला, असाही अर्थ निघू शकतो. २०१४ ला ‘चौकीदार चोर है’ इथपासून सुरू झालेल्या या टीकेपासून औरंगजेब, फेकू, जुमलेबाज ते थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वैयक्तिक आयुष्यावर, त्यांच्या पत्नीचा उल्लेख सार्वजनिक व्यासपीठावरून करण्यापर्यंत या टीका-टिप्पणीचा स्तर खाली आला आहे. (Lok Sabha Election 2024)

(हेही वाचा – Lok Sabha Election 2024: नाशिकमध्ये 25 केंद्रांवर सीसीटीव्ही यंत्रणा, नागरिकांना मतदान केंद्रांवरील गर्दी पाहता येणार)

‘ते’ विरोधक श्रोत्यांसाठी पर्वणी
गेल्या ५ वर्षांत तर वैयक्तिक चिखलफेक करण्याची चढाओढ लागल्याचे चित्र राजकारणात दिसत आहे. काही ठराविक राज्यात राजकीय विरोधक म्हणजे कट्टर शत्रू मानले जात, त्याचे अनुकरण प्रगत, पुढारलेला महाराष्ट्र करतोय असे म्हटले तरी अतिशयोक्ती ठरणार नाही. पंधरा-वीस वर्षांपूर्वीपर्यंत राजकीय विरोधक एकाच व्यासपीठावर येऊन भाषण करत असत आणि ही श्रोत्यांसाठी मनोरंजनात्मक पर्वणी ठरत होती.

देशमुख-मुंडे, जोशी-नवलकर
मराठवाड्यातील कॉँग्रेस नेते, माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि भाजपा नेते, माजी केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे हे राजकीय विरोधक अनेकदा एका मंचावर आले आणि एकत्रित समारंभ गाजवले. त्यांची एकमेकांवरील टीका ऐकणाऱ्यास ती कधीच घृणास्पद वाटली नाही. शिवसेना नेते मनोहर जोशी आणि प्रमोद नवलकर हे राजकीय विरोधक नव्हते तर एकाच पक्षात काम करत होते. मात्र त्यांचे त्यांच्या विभागावर म्हणजे जोशी यांचे दादरवर आणि नवलकर यांचे गिरगाववर असलेले प्रेम सर्वश्रुत होते. दोघे आपापला विभाग आणि विभागातले लोक, तेथील वैशिष्ठे यावर भाष्य करत एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न ज्या शब्दांतून करत असत, त्याला तोड नाही. अशा कार्यक्रमांतून श्रोत्यांच्या ज्ञानात काही प्रमाणात भर पडत असे, तसेच श्रोते मजाही घेत असत.

टीकेनंतर मैत्री कायम
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसचे शरद पवार हे राजकीय विरोधक पण त्यांच्या परस्परविरोधी टीकेने कमरेखालील पातळी कधी गाठली नाही. राजकीय सभांमधून टीका झाल्यानंतरही ते एकमेकांचे चांगले मित्र होते आणि घरघुती नाते-संबंध त्यांनी कायम जपले. नव्या पिढीला यातील काही गोष्टी वाचून, ऐकून आश्चर्य वाटेल, इतके राजकीय वातावरण आज गढूळ झाले आहे.

पवारांसोबत राहून भाषा ‘तीच’
‘त्या’ पिढीतील एक, शरद पवार आज हयात आहेत. विशेष म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र उद्धव त्यांच्यासोबत निवडणूक आघाडीत आहेत. तरीदेखील उद्धव ठाकरे ज्या भाषेचा वापर करताना दिसतात ती भाषा त्यांच्याकडून अपेक्षित नाही. टरबूज, गद्दार, माझा बाप चोरला, औरंगजेब, फेकू, खोटारडे, जुमलेबाज या शब्दांना राजकारणात उत आला आहे. गेल्या पाच वर्षात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील गटाच्या नेत्यांना अन्य पक्ष विशेषतः विरोधी पक्ष जसे भाजपा, शिवसेना-शिंदे पक्षाच्या नेत्यांशी अधिवेशन काळात समोरा-समोर आल्यास बोलणेही दुरापास्त झाले आहे. गेल्या काही दिवसांतील उद्धव ठाकरे यांच्या सभा आणि भाषणे तसेच मुलाखती ऐकल्या तर प्रबोधनकार यांचे नातू आणि बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र म्हणून ज्या भाषेचा वापर आणि टीकेचा स्तर यावर न बोललेलंच बरं, अशी प्रतिक्रिया राजकीय विश्लेषक खासगीत व्यक्त करतात.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.