Lok Sabha Election 2024: महाविकास आघाडीचे ‘वेसण’ ‘मातोश्री’च्या हाती !

184
Lok Sabha Election 2024: महाविकास आघाडीचे ‘वेसण’ ‘मातोश्री’च्या हाती !

>> सुजित महामुलकर

कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) यांच्या महाविकास आघाडीत मोठा भाऊ कोण? यावरून सध्या ‘कोल्ड-वॉर’ म्हणजेच शीतयुद्ध सुरू असल्यासारखे वातावरण दिसत आहे. कॉँग्रेस जुना आणि राष्ट्रीय पक्ष असला तरी त्याची वेसण सध्या प्रादेशिक पक्षाचा दर्जा असलेल्या ‘मातोश्री’च्या हाती असल्याची चर्चा कॉँग्रेस पक्षात होताना दिसत आहे.

२१ महिन्यांपूर्वी शिवसेनेत तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केले आणि काही मंत्र्यांसह एकूण ४० आमदार एकत्र येत शिवसेना पक्षावरच दावा केला आणि त्यानंतर निवडणूक आयोग तसेच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी खरा पक्ष शिंदे यांचाच असल्याचा निकाल दिला. सध्या हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे.
पक्ष हातातून गेल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाकडे नव्या पक्षाची म्हणजेच ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ नावाच्या पक्षाची नोंदणी केली आणि लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी निवडणूक आयोगाने त्यांना ‘मशाल’ हे चिन्ह दिले.

उर्वरित आमदारांसह महाविकास आघाडी
२०१९ ची विधानसभा निवडणूक जरी शिवसेना-भाजपाने युती म्हणून लढवली असली तरी निवडणूक निकाल आल्यानंतर शिवसेनेने मित्रपक्ष भाजपासोबत सरकार स्थापन न करता, विरोधी पक्ष असलेल्या कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाशी आघाडी करत राज्यात ‘महाविकास आघाडी’ सरकार स्थापन केले. जवळपास अडीच वर्षे सत्तेत राहिल्यानंतर ‘त्या’ महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉँग्रेस या पक्षात फूट पडली आणि उर्वरित आमदारांसह (शिवसेना उबाठा आणि राष्ट्रवादी कॉँग्रेस शरदचंद्र पवार गट) महाविकास आघाडी सध्या अस्तित्वात आहे.

(हेही वाचा – Nitin Gadkari : नितीन गडकरींनी सांगितले ४०० पारचे गणित; म्हणाले आमच्या सरकारने…)

शिवसेना उबाठा ‘मविआ’चे नेतृत्व करत असल्याचे चित्र
सध्या काही आमदारांचा अपवाद वगळता एकसंघ राहिलेला कॉँग्रेस आणि अन्य दोन गट लोकसभा निवडणूक एकत्र लढविण्याच्या तयारीत आहेत. गेले तीन महीने त्यांच्यात जागावाटपावर चर्चेचे गुऱ्हाळ सुरू आहे. आजही (शुक्रवार २९ मार्च) चर्चा संपली नसून काही मतदारसंघाचे उमेदवार १-२ दिवसात घोषित करू, असे उबाठाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी स्पष्ट केले. राज्यातील एकूण ४८ लोकसभा मतदारसंघांपैकी उबाठा गट २२ जागा लढणार, कॉंग्रेस १७ आणि राष्ट्रवादी (शप) गट ९ जागांवर आपले उमेदवार उतरवणार, असे सध्या ठरले आहे. आजच्या घडीला राज्यात कॉँग्रेसचे जवळपास ४० आमदार असून पक्ष अजून एकसंघ आहे. असे असतानाही ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील १२-१३ आमदारांचा पक्ष/गट हा राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या शरद पवार यांच्या सल्ल्याने महाविकास आघाडीचे नेतृत्व करत असल्याचे चित्र राज्याच्या राजकारणात दिसत आहे.

सांगलीच्या निमित्ताने अंतर्गत धुसपुस उफाळून आली
शिवसेना उबाठा आपली मते आघाडीतील अन्य दोन्ही पक्षांवर लादत असल्याची खंत कॉंग्रेस नेते खासगीत बोलताना व्यक्त करतात. ते उघडपणे आपल्या भावना व्यक्त करताना दिसत नसले तरी अंतर्गत धुसपुस सांगलीच्या उमेदवारीच्या निमित्ताने उफाळून आल्याचे स्पष्ट झाले आहे. सांगलीसह, रायगड आणि अन्य काही उमेदवाऱ्या परस्पर जाहीर केल्याने शिवसेना उबाठाविरुद्ध कॉँग्रेसमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. मुंबईत तर उबाठा गटाने सहापैकी पाच जागांवर आपला दावा केला असून केवळ एक जागा कॉँग्रेसच्या वाट्याला सोडून तोंडाला पाने पुसली. राष्ट्रवादी कॉँग्रेसला (शप) तर एकही जागा न सोडून राज्याच्या राजाधानीतूनच नाही तर वेशीवरूनही (ठाणे, कल्याण-डोंबिवली, पालघर) हद्दपार केले.

काँग्रेस नेते का गप्प?
‘तोंड दाबून बुक्क्यांचा मार’ अशा परिस्थितीत कॉँग्रेस असून सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही, ही अवस्था आहे. हे सगळे कॉँग्रेस का सहन करत आहे? असा प्रश्न कॉँग्रेस कार्यकर्त्यांना पडला नाही तर नवल. मात्र, या प्रश्नाचे उत्तर कार्यकर्त्यांकडे नाही. राज्यातील एखाद्या कॉँग्रेस नेत्याने यावर आवाज उठवलाच तर उबाठा गटाकडून ‘आम्ही कॉँग्रेसच्या वरिष्ठ (दिल्लीतील) नेत्यांशी या विषयावर चर्चा केली किंवा करू,’ असा तात्काळ गर्भित इशारा देण्यात येत असल्याने राज्यातील कॉँग्रेस नेते उबाठाशी कोणताही ‘पंगा’ ओढवून घेण्यास धजावत नाहीत. तर एखाद्याने हिंमत दाखवून केंद्रीय नेतृत्वाला सत्य परिस्थितीचा आढावा देण्याचा प्रयत्न केल्यास पक्ष नेतृत्वाकडून त्याकडे सपशेल दुर्लक्ष केले जात असल्याचे सांगण्यात येते.

पक्ष वाचवायचा असल्यास उबाठाशी युती तोडा आणि मैदानात उतरा
काँग्रेसचे माजी खासदार संजय निरुपम यांनी शिस्तभंगाच्या कारवाईची मानसिक तयारी करूनच यावर उघडपणे प्रतिक्रिया देत कॉँग्रेस कार्यकर्त्यांच्या मनातील खदखद बोलून दाखवली. कॉँग्रेस पक्षाचे अस्तित्व राखायचे असेल तर शिवसेना उबाठाशी असलेली युती तोडा आणि मैदानात उतरा असा ‘रोखठोक’ सल्लाच त्यांनी दिला. ‘‘मुंबईतील सहापैकी पाच जागा उबाठाच्या ताब्यात देणे हे कॉँग्रेस पक्षाला मुंबईत ‘दफन’ करण्याचा एक कार्यक्रम आहे. फार नाही, दहा-बारा वर्षांपूर्वीच्या काळात, एक वेळ अशी होती की मुंबईमध्ये सहापैकी पाच खासदार कॉँग्रेसचे आणि एक राष्ट्रवादीचा होता. आताही मुंबईतील सहापैकी तीन मुंबई दक्षिण-मध्य, मुंबई उत्तर-मध्य आणि उत्तर-पश्चिम मुंबई या मतदारसंघांसाठी आम्ही आग्रही होतो. पण ज्याप्रमाणे उबाठाने कॉँग्रेसवर दबाव टाकून पक्षाला आपल्या पायाशी आणून ठेवले आहे, हे शिवसेना उबाठाच्या नियतीवरच प्रश्नचिन्ह निर्माण करण्यासारखे आहे. अशा परिस्थितीत कॉँग्रेसचा पारंपरिक मतदार कुणाला मतदान करेल? तो उबाठाला मत देईल, याबाबत मला शंका आहे,” असे स्पष्ट मत व्यक्त केल्यानंतर निरुपम यांनी कॉँग्रेसला एक आठवड्याची मुदत देत आपल्याला अन्य पर्याय खुले असल्याचे माध्यमांशी बोलताना नमूद केले. त्याचप्रमाणे शिवसेना उबाठाने परस्पर जाहीर केलेल्या जागांबाबत कॉँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आणि विजय वडेट्टीवार यांनीही दबक्या आवाजात ‘उबाठाने युतीधर्म पाळावा’, असे मत व्यक्त केले.

शिवसेना उबाठा जी मागणी करेल ती कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉँग्रेस (शप) कडून कोणताही विरोध न दर्शवता मान्य करण्यात येत असल्याने महाविकास आघाडीचे नेतृत्व शिवसेना उबाठा करत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.