राज्यातील भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथराव मुंडे यांनी ‘माधन पॅटर्न’साठी पुढाकार घेतला आणि महाराष्ट्रातील बहुजन समाजातल्या वेगवेगळ्या नेत्यांना एकत्र करून आपल्या कामाला सुरुवात केली. ‘मा’ म्हणजे माळी, ‘ध’ म्हणजे धनगर आणि ‘व’ म्हणजे वंजारी या फॉर्म्युल्याने हा ‘माधव पॅटर्न’ सुरू झाला. आता याच ‘माधव पॅटर्न’ मधील ‘ध’ म्हणजेच धनगर नेते महादेव जानकर यांनी महायुतीतून बाजूला होत महाविकास आघाडीत सामील होणार असल्याचे संकेत दिल्याने लोकसभेमध्ये ‘माधव पॅटर्न’ मधील ‘ध’ बाजूला सरकल्याने याचा धोका महायुतीला होऊ शकतो.
जानकर विरुद्ध निंबाळकर अशी लढत…
अनेक दिवसांपासून माढा या लोकसभा मतदारसंघाची विशेष चर्चा आहे. आता महाविकास आघाडीतर्फे माढ्यातून राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जनाकर यांनाच उमेदवारी मिळणार हे जवळजवळ स्पष्ट झाले आहे. शरद पवार यांच्याकडून जानकर यांच्या नावाचा विचार चालू झाल्यानंतर खुद्द महादेव जानकर यांनीदेखील हालचाली सुरू केल्या. त्यांनी भाजपाचे नाराज नेते मोहिते पाटील आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील संजीवबाबा निंबाळकर यांची भेट घेतली होती. दुसरीकडे भाजपाकडून रणजितसिंह निंबाळकर हे मैदानात उतरले आहेत. त्यामुळे येथे जानकर विरुद्ध निंबाळकर अशी लढत पाहायला मिळणार आहे.
महादेव जानकर हे राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून धनगर आणि ओबीसी मतांचे राजकारण करतात. राज्यामध्ये धनगर मतांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यातल्या त्यात काही लोकसभा मतदारसंघांमध्ये एक गठ्ठा धनगर मते ज्या उमेदवाराच्या पारड्यात पडतात तेथील उमेदवार विजयी होतो असे काहीसे गणित राज्यातील काही मतदारसंघांमध्ये आहे. त्यापैकीच माढा, बारामती, सातारा, सांगली तसेच मराठवाड्यातील परभणी आणि हिंगोली मतदारसंघ हा धनगर बहुल मतदारसंघ आहेत. याच धनगर मतांच्या जोरावरती महादेव जानकर यांनी देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री पद देखील भूषवले होते. परंतु आता मागील काही दिवसांपासून महायुतीत होत असलेल्या बैठकांमध्ये रासपच्या महादेव जानकर यांना विशेष महत्त्व दिले जात नसल्याने त्यांनी स्वतंत्र आपली यंत्रणा राबवण्यास सुरुवात केली होती. याचाच फायदा उचलत शरद पवार यांनी जानकर यांना जवळ करून स्वतःची कन्या सुप्रिया सुळे यांच्यासाठी असलेला बारामती मतदारसंघ सोपा करून घेतला आहे, असे जाणकारांचे मत आहे.
पूर्वाश्रमीचे रासपचे आमदार राहुल कुल यांना फोडून आपल्या पक्षात घेतल्यामुळे आपण त्यावेळेपासून भाजपावर नाराज असून येणाऱ्या निवडणुकीत माढा मतदारसंघातून दोन लाख ते अडीच लाखापेक्षा अधिक मताधिक्याने निवडून येणार असा दावा महादेव जानकर यांनी केला आहे. शरद पवार त्यांना माढामधून विजयी करण्यास मदत करतील, तर बारामतीच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांना आपली मदत होईल. माढ्यातील जनता विद्यमान खासदार निंबाळकर यांच्यावर नाराज आहे, असा दावाही जानकर यांनी केला.
परंतु खासदार विकास महात्मे यांना राज्यसभेवर भाजपाद्वारे याआधी पाठवण्यात आले आहे. ते देखील धनगर समाजातून येत असल्याने जानकरांच्या एकट्याच्या सांगण्यावरती समाजाची मते किती फिरतील हा देखील संशोधनाचा विषय आहे. असे म्हणण्याचे अनेक कारणे असू शकतात. कारण कोणताही समाज बराच काळ एकाच नेत्याच्या मागे चालत नसतो. प्रत्येक समाज हा नेत्याला वेळ देऊन पाहत असतो. समाजाच्या अपेक्षा पूर्ण न झाल्यास त्या नेत्याचा समाजातील असलेला जनाधार हळूहळू कमी होत जातो. अशा प्रकारच्या सर्व पहलूंचा सारासार विचार महायुतीतील भाजपाने देखील नक्कीच केला असेल. त्यामुळे जानकरांच्या या दाव्यांचा प्रभाव किती होतो हे लोकसभेच्या निकालानंतरच ठरवता येईल.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community