लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election 2024) मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी रत्नागिरी जिल्हा प्रशासनाचा जोरदार प्रयत्न सुरू आहे. गेल्या निवडणुकीपेक्षा १० टक्के मतदान यंदा वाढावे, यासाठी अनेक ठिकाणी सेल्फी पॉइंट, ध्वनिक्षेपकांवरून जनजागृती, पथनाट्य, जाहिराती आदींवर भर देण्यात आला आहे. मतदान ७० टक्क्यांहून अधिक होण्यासाठी प्रशासनाची धडपड सुरू आहे.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर निवडणूक विभागही कामाला लागला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील तीन आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीन अशा सहा विधानसभा मतदारसंघांचा हा लोकसभा मतदारसंघ आहे. गेल्या निवडणुकीत ६१.५२ टक्के मतदान झाले होते. निवडणूक आयोगाने जास्तीत जास्त मतदान होण्यावर भर दिला आहे. तशा सूचना निवडणूक अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. त्यानुसार या निवडणुकीत गेल्या निवडणुकीपेक्षा १० टक्के जादा मतदान व्हावे यासाठी जिल्हा प्रशासनाने प्रयत्न सुरू केले आहेत.
(हेही वाचा – Swatantra Veer Savarkar: ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ चित्रपटाच्या विशेष शोचे अभिनेते-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्याकडून आयोजन)
सेल्फी पॉइंट, पथनाट्ये…
मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क चोख बजावावा, यासाठी त्यांच्यामध्ये जनजागगृती केली जात आहे. दोन्ही जिल्ह्यांमध्ये मोक्याच्या ठिकाणी मतदान सेल्फी पॉइंट तयार करण्यात आले आहेत. शहरांमधून फिरणाऱ्या कचरागाड्यांवर मतदानाची जनजागृती करणारी माहिती ध्वनिक्षेपकावरून प्रसारित केली जात आहे. ठिकठिकाणी पथनाट्यांद्वारे जागृती केली जात आहे. सोसायट्या, सार्वजनिक ठिकाणे, मोक्याच्या जागांवर ही पथनाट्ये सुरू आहेत. मच्छीमार, शेतकरी आदींमध्ये जास्तीत जास्त जनजागृती व्हावी यासाठी प्रशासनाचा प्रयत्न सुरू आहे. यंदा ७० टक्क्यांच्या वर मतदान व्हावे, अशी निवडणूक विभागाची अपेक्षा आहे.
Join Our WhatsApp Community