Lok Sabha Election 2024: युती-आघाडीत कुरघोडीचे राजकारण

331
Lok Sabha Election 2024: युती-आघाडीत कुरघोडीचे राजकारण
Lok Sabha Election 2024: युती-आघाडीत कुरघोडीचे राजकारण
  • सुजित महामुलकर

    लोकसभा २०२४ (Lok sabha Election 2024) चे निकाल लागून चार दिवस होत नाहीत तोच सत्ताधारी आणि विरोधी अशा दोन्ही राजकीय युती आणि आघाडीमध्ये एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप, कुरघोडी करण्याची अहमहमिका सुरू झाली आहे. राज्यात अनेक भागात दुष्काळसदृश परिस्थिति, शेतकऱ्यांचे प्रश्न, शहरांमध्ये पाणीकपात, नालेसफाई, पावसाळ्यातील पूर नियंत्रण व्यवस्थापन असे अनेक प्रश्न ‘आ’वासून उभे असताना पुढील चार महिन्यांवर राज्यात येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणूकीसाठी विविध राजकीय मंडळींची जुळवाजुळव, वैयक्तिक स्वार्थ आणि राजकीय पोळी भाजून घेण्याची धडपड पुन्हा एकदा सुरू झाल्याचे चित्र दिसून येत आहे. (Lok Sabha Election 2024)

    या लोकसभा निवडणुकीने (Lok Sabha Election) अनेक दिग्गजांना जमिनीवर आणले तर काही अनपेक्षितपणे लोकसभेत गेले. ज्यांनी मतदारांना गृहीत धरले त्यांना धक्का बसला आणि याबाबत आत्मपरीक्षण करण्याऐवजी स्व-पक्षीय आमदार आणि मित्रपक्षांवर खापर फोडण्यात धन्यता मानू लागले.

    संभाजी नगरात शिवसेना उबाठामध्ये ‘कोल्ड वॉर’

    संभाजी नगरचे महाविकास आघाडीतील शिवसेना उबाठा गटाचे उमेदवार, माजी खासदार चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेल्यानंतर त्यांनी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांच्यावर काम न केल्याचा ठपका ठेवत, पक्षश्रेष्ठींकडे तक्रार करणार असल्याचे जाहीर केले. दानवे सध्या विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (भाजपा) आणि विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) (शिवसेना-शिंदे) यांच्यासोबत रशियाच्या दौऱ्यावर आहेत. दानवे यांनी निवडणूक तिकीट वाटापाआधीच आपण या जागेसाठी इच्छुक असल्याचे विधान केले होते. या दोघांमधील ‘कोल्ड वॉर’ संभाजी नगरवासियांना नवे नाही.

    महायुतीत कोकणात बेबनाव

    रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार भाजपाचे नारायण राणे (Narayan Rane) निवडून आले असले तरी त्यांचे पुत्र, माजी खासदार निलेश राणे यांनी रत्नागिरीचे पालकमंत्री आणि शिवसेनेचे (शिंदे) आमदार उदय सामंत यांच्यावर त्यांच्या भागातून कमी मतदान झाल्याचा ठपका ठेवला. तसेच उदय सामंत यांचे बंधु किरण सामंत हे निवडणुकीदरम्यान उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना भेटले, असा आरोपही केला. किरण सामंत हे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यास इच्छुक होते. उदय सामंत (Uday Samant) यांनी या आरोपांना उत्तर देत ‘आपल्या प्रामाणिकपणाबद्दल कुणाच्या सर्टिफिकेटची गरज नाही,’ असे म्हणत राणे यांचे आरोप फेटाळून लावले. भविष्यात निलेश राणे रत्नागिरी विधानसभेच्या जागेवर दावा करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे यासाठीची पार्श्वभूमी तयार करण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.

    सांगलीत आघाडीत बिघाडी

    सांगली लोकसभा मतदारसंघात तर महाविकास आघाडीत निवडणुकीआधीच शिमगा सुरू झाला होता. त्याच्या ज्वाळा अजूनही धुमसत आहेत. शिवसेना उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या जागावाटपाची चर्चा सुरू असतानाच सांगलीत जाऊन परस्पर चंद्रहार पाटील (Chandrahar Patil) यांची उमेदवारी घोषित केली. कॉंग्रेसचे स्थानिक आमदार विश्वजित कदम यांनी चंद्रहार पाटील यांच्या उमेदवारीला विरोध दर्शवत कॉंग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील (Vishal Patil) यांना उमेदवारी देण्याची मागणी लाऊन धरली होती. कदम यांनी थेट दिल्ली गाठत कॉंग्रेस हायकमांडकडे विशाल पाटील याच्या उमेदवारीसाठी आग्रह धरला मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही. शिवसेना उबाठानेही चंद्रहार यांच्या उमेदवारीचा हट्ट सोडला नाही आणि विशाल पाटील यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला. कॉंग्रेसने मात्र त्यांच्यावर कोणतीही शिस्तभांगाची कारवाई केली नाही. गुरुवारी ६ जूनला विशाल पाटील यांनी सोनिया आणि राहुल गांधी यांची दिल्लीला जाऊन भेट घेतली, यातच सगळं आलं. शिवसेना उबाठाने यातून काय तो धडा घ्यावा.

    महायुती मित्रपक्षाने सांगून पाडले

    अमरावतीत महायुतीचे घटक पक्ष असलेले बच्चू कडू (Bacchu kadu) यांनी टोकाची भूमिका घेत भाजपाच्या नवनीत राणा यांच्या उमेदवारीला विरोध केला होता मात्र भाजपाने कडू यांना गृहीत धरत राणा यांची उमेदवारी कायम ठेवली. कडू यांनी जाहीर आव्हान देत ‘नवनीत राणा यांना पाडणार’ अशी विधाने करूनही भाजपाने त्याकडे कानाडोळा केला आणि कडू यांचा उद्देश सफल झाला. त्यांचा उमेदवार पडला ते भाजपाच्या उमेदवाराला घेऊनच. भिवंडीतही केंद्रीय राज्य मंत्री भाजपाचे कपिल पाटील यांना पराभवाची धूळ चाखावी लागली. त्यांनी याचे खापर भाजपाचेच आमदार किसन कथोरे यांच्यावर फोडले.

    युती-आघाडीची विधानसभा गणिते सुरू  

    अशाप्रकारे दोन्ही बाजूचे अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले आहेत. लोकसभेचा धुरळा अजून जमीनीवर बसत नाही तोवर विधानसभेसाठी मैदान पुन्हा सज्ज झाले आहे. सध्या तरी या मैदानात सत्ताधारी आणि विरोधी पक्षातले नेते आपापसातच एकमेकांना पाण्यात पाहू लागले असून अधिक जागा कशा पदरात पाडून घेता येतील यादृष्टीने सोयीनुसार तार्किक विधाने करू लागले आहेत. महाविकास आघाडीतील शिवसेना उबाठा प्रवक्ते संजय राऊत यांनी ‘शिवसेना उबाठा नसती तर कॉंग्रेस-राष्ट्रवादीला एवढ्या जागा मिळाल्या नसत्या’, असा दावा करत स्वतःचे महत्व वाढविण्याचा प्रयत्न केला. तर ‘कॉंग्रेस कालही एक लोकसभा जागा असून मोठा भाऊ होता’, असे उत्तर कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिले. आज तर कॉंग्रेसचे राज्यात १४ खासदार असल्याने आघाडीत कॉंग्रेसला विधानसभेच्या सर्वाधिक जागांसाठी आग्रही राहण्याची संधी आहे, यात शंका नाही.

    अजितदादा युतीत किती तग धरतील?

    अजित पवार (DCM Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या चारपैकी दोन जागांवर त्यांच्या पक्षाचे उमेदवार उभे होते तर त्यातील एक निवडून आले. अन्य दोन उमेदवार मित्रपक्ष भाजपा आणि शिवसेना (शिंदे) यांच्याकडून आयात केलेले असले तरी पक्ष अजून या धक्क्यातून सावरलेला दिसत नाही. मुळात अजित पवार, त्यांची विधारधारा लक्षात घेता, भाजपा-शिवसेनेसोबत किती दिवस तग धरू शकेल, याबाबत साशंकता आहे.

    भाजपाने धडा घ्यावा!

    राज्यातील भाजपा वरवर खूप ‘अॅक्टिव’ दिसत असली तरी ‘मोदी है तो मुमकिन है’ या भ्रमात राहिल्याने हा घात झाला, असे आता म्हणावे लागेल. भाजपाला ही निवडणूक एक ‘धडा’ म्हणून घेत विधानसभेला ही चूक सुधारण्याची एक संधी आहे अन्यथा त्यानंतर होऊ घातलेल्या मुंबई-पुणे-नगपूरसह १४-१५ महत्त्वाच्या महानगरपालिका गामावण्याची वेळ येऊ शकते. शहाण्यास शब्दांचा मार पुरे… तूर्त इतकेच.

हेही पाहा – 

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.