Lok Sabha Election 2024 : मतदानाची आकडेवारी जाहीर करण्याची प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक – एस. चोक्कलिंगम

निवडणूक आयोगाने पहिल्या टप्प्यानंतर ११ दिवसांनी आणि दुसऱ्या टप्प्यानंतर ४ दिवसांनी निवडणूकांची आकडेवारी जाहीर केली आहे.

148
Lok Sabha Election 2024 : मतदानाची आकडेवारी जाहीर करण्याची प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक - एस.चोक्कलिंगम

मतदानाच्या दिवशी मतदानाची जी टक्केवारी जाहीर करण्यात येते ती कच्ची आकडेवारी असते. मतदानाच्या दुसऱ्या दिवशी एंड ऑफ पोलची जी आकडेवारी देण्यात येते ती अंतिम आकडेवारी असते. तसेच मतदानाच्या दिवशी फॉर्म १७ क नुसार राजकीय पक्षाच्या पोलिंग एजंटना संबंधित मतदान केंद्रातील आकडेवारी देण्यात येते. अंतिम आकडेवारी सोबत ती कोणीही पडताळून पाहू शकते. त्यामुळे ही संपूर्ण प्रक्रिया संपूर्णपणे पारदर्शक आहे, त्यात काहीही गोपनीय नाही असे स्पष्टीकरण राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम (S. Chokkalingam) यांनी दिली. मंत्रालयात आयोजित पत्रकारपरिषदेत ते बोलत होते. सोबत अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी किरण कुलकर्णी देखील सोबत होते. राज्यात उन्हाच्या वाढत्या तडाख्याचा मतदानावर परिणाम होऊ नये म्हणून आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत असेही त्यांनी सांगितले. (Lok Sabha Election 2024)

निवडणूक आयोगाने पहिल्या टप्प्यानंतर ११ दिवसांनी आणि दुसऱ्या टप्प्यानंतर ४ दिवसांनी निवडणूकांची आकडेवारी जाहीर केली आहे. ही आकडेवारी आयोगाने आधी जाहीर केलेल्या मतदानाच्या आकडेवारीपेक्षा ३ ते ५.७५ टक्के अधिक आहे. तसेच मतदानाचे प्रत्यक्ष आकडे देण्यापेक्षा फक्त टक्केवारी देण्यात आली आहे. हे संशयास्पद असल्याची टीका विरोधी पक्षांनी केली आहे. त्याबाबत विचारले असता एस. चोक्कलिंगम (S. Chokkalingam) म्हणाले, ज्या दिवशी मतदान पार पडत असते त्या दिवशी सकाळपासून विविध टप्प्यात मतदानाची टक्केवारी जाहीर करण्यात येत असते. मात्र ही टक्केवारी ढोबळ स्वरूपाची असते. मतदानाच्या दुसऱ्या दिवशी रात्री जी एंड ऑफ पोल आकडेवारी येते तीच अंतिम असते. तसेच मतदानाच्या दिवशी सर्व राजकीय पक्षांच्या पोलिंग एजंटसना फॉर्म १७ क नुसार संबंधित मतदान केंद्रात झालेल्या मतदानाची अचूक आकडेवारी देण्यात येते. ही आकडेवारी त्याचवेळी सीलबंद करण्यात येते. नंतर कोणीही ही आकडेवारी अंतिम एकूण आकडेवारीशी पडताळून पाहू शकतो. त्यात कोणतीही गोपनीयता नाही. त्यामुळे आता झालेल्या मतदानाच्या टक्केवारीत नंतर अचानक वाढ झाली असे कोणी म्हणू शकत नाही. महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात २०१९ च्या तुलनेत सरासरी तितकेच मतदान झाले आहे. तसेच दुसऱ्या टप्प्यात त्यात ०.२१ टक्के इतकीच वाढ नोंदविण्यात आली असल्याचे चोक्कलिंगम यांनी स्पष्ट केले. (Lok Sabha Election 2024)

(हेही वाचा – Modi’s Public Rally in Satara : साताऱ्यातील मोदींच्या अफाट सभेच्या यशस्वी नियोजनामागे धैर्यशील पाटील)

उबाठा गटाच्या प्रचारगीतावरील आक्षेप योग्यच

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या मशालगीतातील ‘जय भवानी’ या शब्दावर निवडणूक आयोगाकडून (Election Commission) आक्षेप घेण्यात होता. उद्धव ठाकरे यांनी आपण हा शब्द बदलणार नाही म्हणजे नाहीच अशी आव्हानात्मक भूमिका घेतली आहे. उबाठा गटाकडून या आक्षेपावर पुनर्विचार करण्यात यावा अशी विनंती करण्यात आली होती. मात्र संबंधित समितीने हा आक्षेप पुन्हा योग्यच ठरविला आहे. आता संबंधित राजकीय पक्ष अपिलेट कमिटीकडे पुनर्विचारासाठी याचिका करू शकतो असे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी किरण कुलकर्णी यांनी स्पष्ट केले. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या शासकीय निवासस्थानी राजकीय बैठका झाल्याची तक्रार काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली होती. याबाबत संबंधितांनी अशी कोणतीही राजकीय बैठक झाली नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. त्यावर सचिन सावंत यांच्याकडे काही पुरावे आहेत का अशी विचारणा करण्यात आल्याचेही किरण कुलकर्णी यांनी सांगितले. (Lok Sabha Election 2024)

उन्हाळ्याच्या तडाख्यापासून मतदारांना संरक्षण

राज्यात उन्हाचा तडाखा वाढत चालला आहे. या पार्श्वभूमीवर मतदानाच्या दिवशी मतदारांना जास्तीत जास्त सुविधा मिळाव्यात यासाठी निवडणूक यंत्रणेचा प्रयत्न राहणार आहे. मतदान केंद्रांवर सावलीसाठी मंडपाची व्याप्ती वाढविणे. रिकाम्या खोल्या उपलब्ध असल्यास वेटिंग रूम तयार करून मतदारांना टोकनची व्यवस्था करणे. पाण्याची व्यवस्था तर असणार आहेच पण मतदान केंद्रांवर ओआरएसची पाकिटेही उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. उन्हामुळे मतदार संध्याकाळी मतदानाला बाहेर पडतात. मतदानाची वेळ संध्याकाळी सहा वाजता संपत असते. मात्र संध्याकाळी सहा वाजेपर्यंत जे मतदार मतदानकेंद्र परिसरात प्रवेश करतील त्यांना रात्री कितीही वाजले तरी मतदान करता येणार असल्याचेही चोक्कलिंगम यांनी स्पष्ट केले. (Lok Sabha Election 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.