Lok Sabha Election 2024 : सांगलीत होणार तिहेरी लढत; विशाल पाटील यांची निवडणुकीतून माघार नाहीच

आता जिल्हा काँग्रेसचे नेतृत्व करणाऱ्या विश्वजित कदम यांनाच विशाल पाटील यांच्या विरोधात Lok Sabha Election 2024 मध्ये प्रचार करावा लागणार आहे.

197
सांगली लोकसभा मतदार संघात काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांनी सांगली लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election 2024) अखेरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही. त्यामुळे आता सांगलीत तिहेरी लढत होणार हे निश्चित झाले आहे. काँग्रेसच्या नेत्यांनी विशाल पाटील यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी मनधरणी करण्याचा प्रयत्न असफल झाल्याचे स्पष्ट झाले आहे. 22 एप्रिल ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख होती.
त्यामुळे आता सांगलीतून महाविकास आघाडीचे ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील हे उमेदवार असतील. त्यांच्या विरोधात भाजपाचे खासदार संजय काका पाटील आहेत, तर विशाल पाटील अपक्ष रिंगणात असणार आहेत. त्यामुळे सांगलीसाठी तिरंगी लढत मानली जात असली तरी तब्बल 21 उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे प्रत्येक बूथवर दोन ईव्हीएम असणार आहेत.
आता विश्वजित कदम काय करणार? 
आता जिल्हा काँग्रेसचे नेतृत्व करणाऱ्या विश्वजित कदम यांनाच विशाल पाटील यांच्या विरोधात Lok Sabha Election 2024 मध्ये प्रचार करावा लागणार आहे. विश्वजीत कदम यांनी 25 एप्रिल रोजी सांगलीमध्ये महाविकास आघाडीचा मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्यात  काँग्रेसचे नेते सहभागी होणार आहेत. त्यामुळे आता ज्या विश्वजित कदम यांनी विशाल पाटील यांच्या उमेदवारीसाठी गल्ली ते दिल्ली प्रतिष्ठा पणाला लावली होती तेच विशाल पाटील यांच्या विरोधात प्रचार करताना दिसणार आहेत. सांगली लोकसभेसाठी कोणत्याही परिस्थितीत महाविकास आघाडी एकसंध असल्याचे दाखवण्यासाठी काँग्रेसकडून प्रचार सभा आयोजित करण्यात आली आहे. या प्रचार सभेसाठी काँग्रेसकडून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात उपस्थित राहणार आहेत. महाविकास आघाडीकडून चंद्रहार पाटील यांच्या प्रचारार्थ काँग्रेसकडून रॅली आयोजित करण्यात आल्याने विशाल पाटील यांच्यासमोर आता आव्हान उभे ठाकलं आहे का? असा सुद्धा प्रश्न उपस्थित झाला आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.