दिल्लीमध्ये सात जागांसाठी सहाव्या टप्प्यात मतदान होणार आहे. 25 मे रोजी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election 2024) भारतीय जनता पक्षाने नवीन रणनीती तयार केली आहे. दिल्लीमध्ये सर्वच राज्यातील लोक राहतात. एवढेच नव्हे तर त्यांच्या 100 ते 200 फ्लॅटसच्या वेगवेगळ्या भागात सोसायटी आहेत. याच भागातील मतदारांना आकर्षित करण्यासाठी त्या त्या राज्यातील नेत्यांवर प्रचाराची जबाबदारी सोपविली आहे.
महाराष्ट्रीयन सोसायटी, बंगाली, तेलगू, तामिळ, भोजपुरी, बिहारी अशा अनेक वसाहती राजधानीमधील वेगवेगळ्या भागात आहेत. यामुळे या मतदारांना आकर्षित करण्यासाठी भारतीय जनता पक्षाने वेगळी रणनीती तयार केली आहे. तसेच पश्चिम विहार, पतपडगंज, द्वारका, राजा एनक्लेव्ह, वसंतकुंज भागात राहणाऱ्या मराठी लोकांसाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भाजपचे महासचिव विनोद तावडे प्रचार करणार आहेत.
(हेही वाचा Arvind Kejriwal यांना दुहेरी झटका, सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा नाही, २० मेपर्यंत कोठडी)
स्थानिक भाषेतील प्रचारावर भर
तसेच परदेशात शिक्षण घेतलेल्या आणि अस्खलित इंग्रजी बोलणाऱ्या महिला उमेदवार गावोगावी जाऊन टिपिकल हरियाणी भाषेत मते मागत आहेत, तर खेड्यापाड्यात शिकलेला उमेदवार पॉश भागात अस्खलित इंग्रजी बोलून मते मागत आहेत. एवढेच नाही काही उमेदवार पंजाबी भाषेत बोलत असून शीखबहुल भागात मतदान करण्याचे आवाहन करत आहेत. त्याच वेळी, पूर्वांचली नेते भोजपुरीमध्ये भाषणे देऊन मतदारांना आकर्षित करण्यात व्यस्त आहेत, असे दृश्य जवळपास दीड महिन्यांपासून राजधानीत पाहायला मिळत आहे. ईशान्य दिल्लीचे खासदार आणि उमेदवार मनोज तिवारी आणि बिहारचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांना भोजपुरी लोकांसाठी प्रचार करायचा आहे.तसेच ते पूर्वांचलच्या लोकांसाठी देखील प्रचार करणार आहेत. अरविंदर लवली यांनीही काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. आता त्यांनाही शीख मतदारांना भाजपला मतदान करण्यासाठी उमेदवारांचा प्रचार करायचा आहे. भाजपने 40 स्टार प्रचारकांची यादी निवडणूक आयोगाकडे पाठवली आहे. यामध्ये दिल्लीमधील सात जागेवर प्रचार करण्याची जबाबदारी पक्षाच्या मोठ्या नेत्यांसह पंतप्रधान मोदी यांच्यावर सोपविण्यात आली आहे. (Lok Sabha Election 2024)
विविध राज्यांतील लोकांचा विचार
पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री दिल्लीत भाजपच्या लोकसभा उमेदवारांच्या बाजूने प्रचार करणार आहेत. पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंह यांनी दिल्लीतील स्टार प्रचारकांची यादी निवडणूक आयोगाला सादर केली आहे. यामध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ तसेच अनेक राज्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री, राष्ट्रीय अधिकारी आणि दिल्लीशी संबंधित नेत्यांचा समावेश आहे. स्टार प्रचारकांच्या यादीत एकूण 40 भाजप नेत्यांच्या नावांचा समावेश करण्यात आला आहे. यादी तयार करताना दिल्लीत राहणाऱ्या विविध राज्यांतील लोकांचा विचार करण्यात आला आहे. त्यांचा पाठिंबा मिळवण्यासाठी त्या राज्यातील लोकप्रिय नेत्यांना स्टार प्रचारक बनवले आहे. उत्तराखंडमधील जनतेचा पाठिंबा मिळवण्यासाठी मुख्यमंत्री पुष्कर धामी अनेक दिवसांपासून दिल्लीत सक्रिय आहेत. (Lok Sabha Election 2024)
Join Our WhatsApp Community