राज्यात ४८ लोकसभा जागांपैकी ३० जागांवर भाजपाच्या नेतृत्वाखालील महायुतीला यश मिळेल, तर १८ जागांवर कॉँग्रेसच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीला समाधान मानावे लागेल, असे ‘हिंदुस्थान पोस्ट’च्या या डिजिटल मीडियाने केलेल्या मतदान-पश्चात सर्वेक्षणात (Exit Poll) स्पष्ट झाले आहे. यात काही धक्कादायक निकाल असून काही अनपेक्षित यश मिळाल्याचे दिसून आले आहे. सर्वेक्षणात मुंबईच्या सहा जागांसह महामुंबईतील (एमएमआर) सर्व दहा जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी होतील. मात्र राज्यातील दोन केंद्रीय मंत्र्यांना (भाजपा) निवडणुकीत पराभव पत्करावा लागणार असल्याचे दिसून येत आहे.
अजित पवारांना चारपैकी २ विजय
राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघांपैकी महायुतीच्या पारड्यात ३० जागा सर्वेक्षणात देण्यात आल्या असून भाजपाला २८ पैकी १९ जागांवर विजय मिळेल तर शिवसेनेने (शिंदे) १५ जागांवर उमेदवार उभे केले त्यात ८ विजयी होतील. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी कॉँग्रेसला चारपैकी २ जागी यश मिळेल आणि एकमेव जागा लढविणारे राष्ट्रीय समाज पक्षाचे (रासप) महादेव जानकर यांचाही परभणीतून विजय निश्चित मानला जात आहे.
कॉँग्रेसला केवळ ७ जागा
महाविकास आघाडीला ४८ पैकी १८ जागांवर विजय मिळेल. त्यातील शिवसेना उबाठा गटाने २१ जागा लढवल्या त्यात त्यांना केवळ ८ जागांवर समाधान मानावे लागेल तर कॉँग्रेसने १७ जागांवर उमेदवार उभे केले त्यातील दहा पराभूत होतील आणि ७ विजयी होतील, तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाने १० जागा लढवल्या त्यात ३ जागी यश मिळवू शकेल, असे सर्वेक्षणावरून दिसून येत आहे.
मुंबईसह ‘एमएमआर’मधील सर्व १० जागा महायुतीला
विशेष म्हणजे मुंबईसह ‘एमएमआर’मधील दहाच्या दहा मतदारसंघात महायुतीचा झेंडा फडकेल, असा अंदाज या सर्वेक्षणात व्यक्त करण्यात आला आहे. यात भाजपा आणि शिवसेना प्रत्येकी पाच जागांवर भगवा फडकावेल. मुंबई उत्तर, मुंबई उत्तर-मध्य, ईशान्य मुंबई, पालघर आणि भिवंडी या जागांवर भाजपाचे उमेदवार निवडून येतील तर उर्वरित मुंबई उत्तर-पश्चिम, मुंबई दक्षिण-मध्य, मुंबई दक्षिण, ठाणे आणि कल्याण या जागांवर शिंदे यांच्या शिवसेनेचा झेंडा फडणकार असल्याचे चित्र आहे.
(हेही वाचा POK पाकिस्तानचा भाग नाही; इस्लामाबाद हायकोर्टात पाक सरकारने केला खुलासा)
नारायण राणे, भारती पवारांना धक्का
राज्यातील दोन केंद्रीय मंत्री, रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार नारायण राणे तसेच दिंडोरीच्या भाजपा उमेदवार भारती पवार यांना पराभव पत्करावा लागण्याची शक्यता या सर्वेक्षणात दिसून येत आहे. तर अन्य केंद्रीय मंत्री नागपूरमधून नितीन गडकरी, मुंबई उत्तरचे पीयूष गोयल, भिवंडी मतदार संघाचे कपिल पाटील आणि जालनाचे रावसाहेब दानवे यांचा विजय निश्चित असल्याचे सर्वेक्षणात म्हटले आहे.
दोनही राजे लोकसभेत जाणार
अन्य महत्वाच्या लढतीत राज्यातील दोन गाद्यांचे वंशज साताऱ्याचे छत्रपती उदयनराजे भोसले हे भाजपाकडून उमेदवार होते तर कोल्हापूर गादीचे छत्रपती शाहू महाराज कॉँग्रेसकडून निवडणूक रिंगणात होते. हे दोन्ही राजे लोकसभेत जाणार असल्याचे दिसत आहे. बारामतीत अजित पवार यांच्या राष्ट्रीय कॉँग्रेसच्या सुनेत्रा पवार विजयी होतील आणि शरद पवार यांना मोठा धक्का बसेल, तर चंद्रपूरमध्ये राज्यातील एक ज्येष्ठ मंत्री सुधीर मुनगंटीवार हे कॉँग्रेसच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर यांच्याकडून पराभूत होतील, असा अंदाज आहे.
अभ्यासपूर्ण सर्वेक्षण
‘हिंदुस्थान पोस्ट’ या डिजिटल मीडियाच्या स्वतंत्र आणि नि:पक्ष सर्वेक्षणात राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघांचा अभ्यास करण्यात आला असून विविध राजकीय विश्लेषक, सर्वसामान्य जनता अशा समाजाच्या प्रत्येक घटकाचा समावेश असलेले हे तटस्थ सर्वेक्षण आहे, असा दावा ‘हिंदुस्थान पोस्ट’चे सल्लागार डॉ. मयूर परिख यांनी केला आहे.
Join Our WhatsApp Community