-
सुजित महामुलकर
सध्या सुरू असलेले राजकारण सर्वसामन्यांसाठी अनाकलनीय आहे, असे म्हटले जाते आणि त्यात तथ्यही आहे. लोक राजकारणाच्या विषयावर नाक्यानाक्यावर जरी अगदी रसरशीत चर्चा करत असले तरी एक मोठा वर्ग, या चर्चेपासून चार हात लांब राहण्याचा प्रयत्न करताना दिसतो. राजकारणाची बजबजपुरी झाली असल्याची सर्वसाधारण प्रतिक्रिया या वर्गाकडून ऐकवयास मिळते. जनता खरंच राजकारणाला कंटाळली आहे? ही वेळ का आली आणि याला जबाबदार कोण?
…तर किती लोक आयपीएलचे सामने बघतील?
देशात लोकसभेच्या निवडणुकांसोबत (Lok Sabha Elections 2024) आयपीएल क्रिकेट सामन्यांचीही धामधूम सुरू आहे. आयपीएलमध्ये एकच खेळाडू उदाहरणार्थ रोहित शर्मा मुंबई इंडियन्स टीममधून खेळतो पण कधी राजस्थान रॉयल्स, चेन्नई सुपरकिंग्स, कोलकाता नाईट रायडर्स तर कधी पंजाब किंग्स किंवा गुजरात टायटन्सच्या टीममधून रोहित खेळायला लागला तर किती लोक आयपीएलचे सामने बघतील किंवा रस दाखवतील?
(हेही वाचा – Salman Khan House Firing : सलमान खानला मारण्याची धमकी 2 वेळा देणारा लॉरेन्स बिष्णोई कोण आहे ?)
राजकीय तडजोडी
असंच काहीसं राजकारणाच्या बाबतीत घडतंय, असं नाही का वाटत? मग लोक राजकारणाला कंटाळले, तर त्यात त्यांचा काय दोष? एखादा राजकीय नेता, आमदार, खासदार एका पक्षातून अचानक उठतो आणि टोकाची विरुद्ध विचारसरणी, भूमिका असलेल्या पक्षात प्रवेश करताना दिसतो. एखादा खासदार ज्या पक्षात असतो त्या पक्षाची उमेदवारी न घेता ‘राजकीय तडजोड’ म्हणून दुसऱ्या पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवतो, राजकीय पक्षाचा प्राथमिक सदस्यदेखील नसताना एखाद्याला निवडणुकीचे तिकीट, उमेदवारी जाहीर होते आणि त्यानंतर त्याचा पक्षात प्रवेश होतो तर एखादा उमेदवारी मिळत नाही म्हणून दुसऱ्या पक्षात जाऊन उमेदवारी मिळवण्यात यशस्वी होतो. अशा परिस्थितीत लोकांनी त्यांच्यावर विश्वास ठेवावा आणि त्यांना पाठींबा दर्शवावा, त्यांच्या प्रचार सभेत सहभागी व्हावे, ही अपेक्षाच करणे कितपत योग्य आहे?
उमेदवारीसाठी भेटीगाठी
उदाहरणेच द्यायची झाली तर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून (मनसे) काही दिवसांपूर्वी बाहेर पडलेले वसंत मोरे. त्यांनी पक्षत्याग केला आणि २४ तासाच्या आत काँग्रेस नेत्यांनी त्यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर मोरे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांना भेटले व पुढे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) पक्षाचे संजय राऊत यांची त्यांनी मुंबईत येऊन भेट घेतली. अखेर त्यांच्याकडून उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली आणि वंचित बहुजन आघाडीने त्यांना उमेदवारी घोषित केली. त्यानंतर त्यांचा वंचित आघाडी पक्षात प्रवेश झाला. (Lok Sabha Elections 2024)
(हेही वाचा – Lok Sabha Election 2024: गृह मतदानासाठी वृद्ध मतदाराने केली पैशांची मागणी, निवडणूक अधिकाऱ्यांनी नाइलाजाने घेतली माघार )
दोन महिन्यांपूर्वी शिवसेना उबाठा पक्षात असलेले शिरूरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी काही दिवसांपूर्वी शिवसेनेत (शिंदे) प्रवेश केला. मात्र शिरूर लोकसभा मतदारसंघ जागावाटपात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या वाट्याला गेला. अजित पवार यांनी पाटील यांची उमेदवारी घोषित केली आणि त्यानंतर काही दिवसांनी त्यांचा पक्षात जाहीर प्रवेश झाला. रावेर मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस (शप) पक्षाचे उमेदवार श्रीराम पाटील हे तीन महिन्यांपूर्वी अजित पवार यांच्यासोबत होते असे म्हटले जाते तर दोन महिन्यांपूर्वी भाजपावासी झाले व आज राष्ट्रवादी शप यांच्याकडून उमेदवारी. ज्येष्ठ काँग्रेस नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे मात्र याला अपवाद म्हणता येतील. चव्हाण यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून (शप) तुतारी चिन्हावर सातारा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची ‘ऑफर’ होती. मात्र त्यांनी नकार दिला, असे समजते. (Lok Sabha Elections 2024)
पक्ष बदलण्याचे प्रमाण प्रचंड वाढले
यापूर्वीही राजकीय नेते आपला पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात प्रवेश करत नव्हते असे नाही. छगन भुजबळ, गणेश नाईक, त्यानंतर नारायण राणे यांनीही पक्ष बदलले. पण तेव्हा अशा घटना क्वचित आणि केव्हातरी घडत असत. गेल्या दोन महिन्यांत त्याची वारंवारता किती झाली हे वेगळे सांगण्याची गरज नाही. एक मात्र नक्की. या घटनांमुळे जनतेच्या मनात राजकारण्यांविषयी असंतोष निर्माण झाल्याचे दिसून येते. याबाबत समाजमाध्यमांवर तिखट प्रतिक्रिया उमटताना दिसते. (Lok Sabha Elections 2024)
(हेही वाचा – Iran Israel Attack : इस्रायलवरील हल्ल्यानंतर भारताने जाहीर केली भूमिका!)
नेते, कार्यकर्ते वेगळे काय करणार?
पूर्वी राजकारणात काही तत्वे, निष्ठा, एक भूमिका याला फार महत्व होते आणि त्या चौकटीत राजकारण फिरत असे. आज हे चित्र पूर्ण बदलते आहे. त्यातल्या त्यात काही अपवाद वगळता भाजपा आणि काँग्रेस या दोन राष्ट्रीय पक्षांमध्ये असे नेते आहेत. बाकी प्रादेशिक पक्षांची अवस्था बिकट आहे. २०१४ ची विधानसभा निवडणूक झाली आणि पूर्ण निकाल लागण्याआधीच शरद पवार यांनी भाजपाला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला, २०१९ मध्ये शिवसेनेने (एकसंघ) भाजपासोबत युतीत निवडणूक लढवली आणि निकालानंतर आडमुठी भूमिका घेत पारंपरिक विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉँग्रेससोबत आघाडी करून सरकार स्थापन केले. पक्षप्रमुखांनीच अशा भूमिका घेतल्यावर नेते, कार्यकर्ते वेगळे काय करणार? (Lok Sabha Elections 2024)
खरी लढत मोदी विरुद्ध गांधी
ही लोकसभा निवडणूक (Lok Sabha Elections 2024) प्रामुख्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) विरुद्ध काँग्रेस नेते राहुल गांधी अशी होत असल्याची भावना सर्वसामान्यांमध्ये व्यक्त केली जात आहे. त्यामुळे राजकीय पक्ष आणि चिन्ह यामध्ये जरी भविष्यात त्यांचा गोंधळ झाला तरी मुख्य उद्देश केंद्रात कोणत्या नेत्याचे किंवा कोणत्या राजकीय पक्षाच्या नेतृत्वाखालील सरकार हवे आहे, यावर जनता मतदान करेल, याची शक्यता अधिक आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community