लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करिता जिल्हा प्रशासन निवडणुकीसाठी विविध साहित्य, आवश्यक बाबी याची जुळवाजुळव, वाहतूक अशा कामात व्यस्त आहे. निवडणूक साहित्यात एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे “न पुसता येणारी शाई अर्थातच… Indelible Ink… म्हणजेच अमिट स्याही… अमिट शाई” लोकसभा निवडणुकीत वापरली जाणार आहे. (Lok Sabha Elections 2024)
(हेही वाचा – Supreme Court : अजित पवार यांना सर्वोच्च न्यायालयाचा धक्का!)
1962 पासून होतो वापर
निवडणुकीच्या वेळी मतदानानंतर मतदाराच्या डाव्या हाताच्या तर्जनीला ही शाई लावली जाते. शाई कुठल्या बोटाला लावावी, ती कशी लावावी, केंद्रावरील कोणत्या अधिकाऱ्याने लावावी याबाबत निवडणूक आयोगाचे स्पष्ट निर्देश आहेत. ही शाई बोटाला लावल्यावर काही वेळातच वाळते आणि साधारण काही आठवडे तशीच राहाते. मतदारांनी मतदान केले आहे आणि तो दुबार मतदानासाठी येणार नाही, याची खात्री करण्यासाठीच या शाईचा मुख्यत्त्वे उपयोग होत असल्यामुळे निवडणूक प्रक्रियेची विश्वासार्हता टिकून राहण्यास मदत होते. निवडणुकांमध्ये मतदानावेळी वापरण्यात येणाऱ्या शाईबद्दल सर्वांनाच कुतूहल असते. ही शाई निवडणूक आयोगाकडून प्राप्त माहितीनुसार साधारण 1962 च्या सर्वसाधारण निवडणुकीपासुन वापरली जाते. म्हैसुर पेन्ट्सचे वैज्ञानिक आणि औद्योगिक अनुसंधान परिषद अर्थातच सीएसआयआर यांनी ही शाई तयार केली होती. न पुसता येणारी शाई तयार करण्यासाठी आयोग विशिष्ट पद्धतीचा वापर करत असते. ही शाई आपल्या शेजारच्या कर्नाटक राज्यातील म्हैसुर येथील म्हैसूर पेन्ट्स आणि वॉर्निश लिमिटेड या कंपनीकडून भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार तयार केली जाते. येथूनच देशातील सर्व राज्यातील जिल्हा निवडणूक कार्यालयांना मागणीनुसार या शाईचा पुरवठा करण्यात येतो. भारत निवडणूक आयोगाच्या (Election Commission of India) निर्देशानुसार ही कंपनी या शाईची निर्यात देखील 30 पेक्षा जास्त देशांना करते.
आयोगाकडून मिळते प्रशिक्षण
सुरुवातीला या शाईचा वापर केवळ लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी करत असत. आता मात्र स्थानिक स्वराज्य संस्था व सहकारी संस्थांच्या निवडणुकांसाठी देखील ही शाई वापरली जाते. साधारण 80 सीसीच्या छोट्या बॉटल्समध्ये ही शाई पाठवण्यात येते. एका बॉटलमध्ये साधारण 800 मतदारांना शाई लावता येते.
प्रत्येक मतदान केंद्रावर तेथील मतदार संख्येनुसार आवश्यक तितक्या बॉटल्स साहित्यासोबत पुरवल्या जातात. मतदान केंद्रावर ही शाई लावण्यासाठी एका अधिकाऱ्याकडे काम सोपविले जाते. आयोगाच्या निर्देशानुसार ही शाई मतदाराच्या डाव्या हाताच्या तर्जनीवर लावण्यात येते. जर मतदार दिव्यांग असेल, त्यास डाव्या हाताचे बोट नसेल, किंवा कदाचितच डावा हातच नसेल, तर अशा वेळी ही शाई कशी लावावी, याबाबत आयोगाच्या स्पष्ट आणि सविस्तर सूचना आहेत. त्यानुसार मतदान अधिकाऱ्यांना प्रशिक्षणाच्या वेळी दिलेल्या सूचनांनुसार अधिकारी आयोगाच्या निर्देशानुसार कार्यवाही करत असतात.
दरम्यान, जिल्ह्यात ज्या युवा मतदारांनी यावर्षी मतदार नोंदणी केली असून हे युवा प्रथमच आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. अशा युवकांनी मतदान केल्यानंतर तर्जनीस लावलेली शाईचा सेल्फी सोशल मीडियाद्वारे आपल्या मित्रमैत्रिणींना पाठवून मतदानाबाबत जनजागृती करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जलज शर्मा यांनी केले आहे. (Lok Sabha Elections 2024)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community