Lok Sabha Elections : मुंबईत मतदानाचा टक्का घसरला, प्रत्यक्षात मतदारांत वाढ

139
Lok Sabha Elections : मुंबईत मतदानाचा टक्का घसरला, प्रत्यक्षात मतदारांत वाढ
  • सुजित महामुलकर

लोकसभा मतदानाची २०१९ आणि २०२४ ची आकडेवारी पाहता मुंबईतील सहा पैकी केवळ मुंबई उत्तर-पश्चिम या एका मतदार संघात अर्ध्या टक्क्याने मतदान वाढले (०.५७) असून अन्य पाच मतदार संघात घटल्याचे आकडेवारीवरून दिसते. सर्वाधिक घट ही मुंबई उत्तर मतदार संघात जवळपास २.९५ टक्के झाली आहे. (Lok Sabha Elections)

दोन शिवसैनिकांमध्येच लढत

मुंबई उत्तर-पश्चिम मतदार संघात दोन शिवसैनिकांमध्येच लोकसभेत जाण्यासाठी लढत झाली आहे. शिवसेनेचे आमदार रवींद्र वायकर विरुद्ध शिवसेना उबाठाचे उमेदवार अमोल कीर्तिकर निवडणूक रिंगणात होते. अमोल हे शिवसेनेचे मावळते खासदार गजानन कीर्तिकर यांचे पुत्र असून वायकर जोगेश्वरीतील गेली १५ वर्षे स्थानिक आमदार आहेत. या मतदार संघात २०१९ मध्ये १७.३२ लाख मतदार होते त्यापैकी ९.४० लाख मतदारांनी मतदान केले तर २०२४ मध्ये १७.३५ लाखापैकी ९.५१ लाख मतदारांनी मतदानात सहभाग घेतला. (Lok Sabha Elections)

वायकर यांना मार्ग सोपा

गेल्या दोन निवडणुकांमध्ये २०१४ आणि २०१९, शिवसेनेचे गजानन कीर्तिकर अनुक्रमे १.८३ लाख आणि २.६० लाख मताधिक्क्याने निवडून आले होते. २०२४ मध्ये शिवसेनेकडून वायकर लोकसभा निवडणुकीला सामोरे गेले असून मतदानामध्ये फार फरक पडला नसल्याने वायकर यांना मार्ग सोपा असल्याची चिन्हे आहेत. (Lok Sabha Elections)

(हेही वाचा – निवडणूक आयोगाचा PMO ला सल्ला; आचारसंहितेचा भंग होणार नाही, याची काळजी घ्या…)

टक्का कमी पण मतदान वाढले

तर अन्य सर्व मतदार संघांमध्ये मतदान टक्केवारी काहीशी घटली आहे. त्यात टॉप वर आहे, उत्तर मुंबई मतदार संघ. या जागी २.९५ टक्के म्हणजे जवळपास तीन टक्के मतदान २०१९ च्या तुलनेत कमी झाले आहे. ही टक्केवारी जरी घटल्याचे दिसत असले तरी प्रत्यक्षात गेल्या निवडणुकीत ९.८८ लाख मतदान झाले होते तर यावेळी १०.३३ लाख मतदारांनी मतदान केले आहे. गेल्या पाच वर्षात लोकसंख्या वाढली असल्याने तुलनेने टक्केवारी कमी दिसत आहे, हेच आकडेवारीवरून स्पष्ट होते. (Lok Sabha Elections)

मतदान अधिक झाले याचा अर्थ गेल्या दोन्ही निवडणुकीतील भाजपाचे गोपाल शेट्टी यांना मिळालेले ४.४६ लाख (२०१४) आणि ४.६५ लाख (२०१९) मताधिक्क्य कमी करून विजयाची पताका फडकावणे, काँग्रेसचे हरिष पाटील यांना भाजपाच्या केंद्रीय मंत्री पीयूष गोयल या उमेदवारासमोर शक्य होईल, असे वाटत नाही. (Lok Sabha Elections)

मुंबई शहरात सरासरी दीड टक्का घसरला

दक्षिण मुंबई आणि दक्षिण-मध्य मुंबई मतदार संघात सरासरी १.५ टक्के मतदान कमी झाले असले तरी प्रत्यक्षात दक्षिण मुंबईत जवळपास २८ हजार आणि दक्षिण-मध्य मतदार संघात ५ हजाराणे मतदान घातले आहे. या दोन्ही मतदार संघात शिवसैनिकच एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. दक्षिण मुंबईत विद्यमान खासदार शिवसेना उबाठाचे अरविंद सावंत विरुद्ध शिवसेनेच्या आमदार यामिनी जाधव तर दक्षिण-मध्य मुंबईत शिवसेना उबाठाचे अनिल देसाई विरुद्ध शिवसेना खासदार राहुल शेवाळे आमने-सामने आहेत. (Lok Sabha Elections)

ईशान्येलाही टक्का कमी मतदान वाढ

उर्वरित दोन मतदार संघात, मुंबई उत्तर-मध्य आणि ईशान्य, टक्केवारी घटली असली तरी प्रत्यक्ष मतदार संख्या वाढली आहे. उत्तर-मध्य मतदार संघात जवळपास ६ हजाराने मतदान वाढले आहे तर ईशान्य मुंबईत टक्केवारी ०.७३ ने कमी झाली असली तरी मतदारांची संख्या सुमारे १५,००० ने वाढली आहे. उत्तर-मध्य मुंबईत राजकारणात नवखे ज्येष्ठ विधितज्ञ भाजपाचे उमेदवार उज्ज्वल निकम तर काँग्रेसच्या आमदार वर्षा गायकवाड निवडणूक रिंगणात आहेत. ईशान्य मुंबईत शिवसेना उबाठाचे संजय दिना पाटील विरुद्ध भाजपाचे आमदार मिहिर कोटेचा मैदानात आहेत. (Lok Sabha Elections)

WhatsApp Image 2024 05 31 at 21.04.31

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.