- सुजित महामुलकर
लोकसभा निवडणुकीच्या २०२४ मधील दोन टप्प्यातील मतदानाची आकडेवारी पाहिली असता, एकूणच मतदानाची टक्केवारी, गेल्या दोन निवडणुकांच्या तुलनेत, कमी असल्याचे आढळून आले आहे. मतदान अधिक झाले तर ते विद्यमान सरकारच्या विरोधात जनतेचा रोष असतो, मागचे दोन अपवाद वगळता, असे म्हटले जाते. यावेळी मतदान कमी होणे हा तिसरा अपवाद ठरणार की कमी मतदान सरकारच्या बाजूने जाते की मोदी-लाट ओसरत असल्याची ही चिन्हे आहेत, हे पाहणे औत्सुकयाचे ठरणार आहे. (Lok Sabha Elections)
परभणीत सर्वाधिक घसरण
या निवडणुकीतील आतापर्यंत मतदानाचे दोन टप्पे पूर्ण झाले असून या १३ मतदार संघात मतदानाची सर्वाधिक टक्केवारी घसरली, १० टककयाहून अधिक, ती परभणी मतदार संघात. २०१४ ला परभणीत ७०.७५ टक्के मतदान झाले होते तर ते खाली येत २०१९ ला ६३.१९ टक्के तर काल (शुक्रवारी २६ एप्रिलला) हा टक्का ६०.०९ वर आला. म्हणजेच २०१४ चा ७० चा टक्का ६० पर्यंत खाली आला. (Lok Sabha Elections)
एक टक्क्याहून कमी फरक
मतदानात सगळ्यात कमी फरक हा नागपूर मतदार संघात बघायला मिळेल. नागपूरला २०१४ मध्ये ५४.४१ टक्के मतदान झाले होते तर २०१९ ला ५४.७४ टक्के लोकांनी मतदानात सहभाग घेतला होता. यावेळी ५३.७१ टक्के मतदान झाले. त्यामुळे सलग तीन निवडणुकांचा विचार करता एक टक्क्याहून कमी फरक या मतदार संघात दिसतो. (Lok Sabha Elections)
कालची सर्वाधिक नोंद, तरी तुलनेत कमीच
यावेळी झालेल्या १३ मतदार संघाची तुलना केली असता गडचिरोली-चिमुर या मतदार संघात काल शुक्रवारी मतदानाची सर्वाधिक ६७.१७ टक्के नोंद झाली, मात्र तीदेखील गेल्या दोन निवडणुकांच्या तुलनेत कमीच आहे. या मतदार संघात २०१४ ला ६९.६७ टक्के तर २०१९ मध्ये ७१.९८ म्हणजे जवळपास ७२ टक्के मतदान झाल्याची नोंद आढळून येते. (Lok Sabha Elections)
भाजपाच्या ‘४०० पार’ला खीळ
मतदान कमी-कमी होत जाण्याच्या कारणांमध्ये कडक उन्हाळा आणि दुसरीकडे अवकाळी पाऊस असे म्हटले जात असले तरी मागच्या दोन्ही निवडणुका या उन्हाळ्यातच झालेल्या आहेत. एक शक्यता अशी वर्तवली जात आहे की, गेल्या दोन्ही वेळेस ‘मोदी लाट’चा परिणाम म्हणून मतदानाची टक्केवारी वाढली असावी. याचा अर्थ यावेळी भाजपाच्या ‘४०० पार’ला महाराष्ट्रात खीळ बसणार, असा काढला जाऊ शकतो. (Lok Sabha Elections)