लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने देण्यात येणारा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर झाला आहे. टिळक स्मारक ट्रस्टचे विश्वस्त डॉ. रोहित टिळक यांनी यासंबंधी घोषणा केली. या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती असणार आहे. परंतु, गेल्या आठवड्यातच राष्ट्रवादीत झालेल्या फुटीनंतर मोदी – पवार प्रथमच एकाच व्यासपीठावर उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे यावर राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
ट्रस्टचे विश्वस्त रोहित टिळक म्हणाले की, मंगळवारी, 1 ऑगस्ट रोजी लोकमान्य टिळक यांची 103 वी पुण्यतिथी आहे. या निमित्त पुण्यात टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या प्रांगणात होणाऱ्या सोहळ्यात मोदी यांना या पुरस्काराने गौरविले जाणार आहे. दीपक टिळक यांच्या हस्ते हा पुरस्कार मोदींना दिला जाणार आहे. पुरस्काराचे यंदाचे 41 वे वर्ष आहे.
(हेही वाचा Eknath Shinde : उद्धव ठाकरे मुख्यमंत्री कसे झाले होते?; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी सांगितली पडद्यामागील कहाणी)
शरद पवार असतील प्रमुख पाहुणे
पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली आत्मनिर्भर भारत या संकल्पनेअंतर्गत देशाने प्रगतीची नवी शिखरे सर केली आहेत. देशवासीयांमध्ये त्यांनी राष्ट्रप्रेमाची भावना जागृत करुन देशाला जागितक पटलावर महत्त्वाचे स्थान मिळवून दिले आहे. या कार्यासाठी ट्रस्टच्या विश्वस्तांनी मोदींच्या नावाची या पुरस्कारासाठी एकमताने निवड केली आहे. या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ नेते शरद पवार यांना निमंत्रित करण्यात आल्याचे रोहित टिळक यांनी सांगितले.
या मान्यवरांची असेल उपस्थिती
या कार्यक्रमासाठी महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, ट्रस्टचे विश्वस्त सुशीलकुमार शिंदे हे देखील उपस्थित राहणार असल्याचे दीपक टिळक म्हणाले. कार्यक्रमाची वेळ लवकरच जाहीर केली जाईल. स्मृतिचिन्ह, मानपत्र आणि 1 लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
Join Our WhatsApp Community