लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election 2024) चौथ्या टप्प्यासाठी सोमवारी (१३ मे) मतदान पार पडत आहे. या टप्प्यात महाराष्ट्रातील ११ जागांसह १० राज्यांमधील ९६ मतदारसंघात मतदान होणार आहे. या टप्प्यात देशभरात एकूण १७१७ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. यासाठी स्थानिक पातळीवर पोलीस आणि प्रशासन सज्ज झाल्याची माहिती आहे.
महाराष्ट्रात नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरुर, नगर, शिर्डी आणि बीड अशा ११ जागांवर मतदान होणार आहे. आंध्र प्रदेश २५, झारखंड ४, मध्य प्रदेश ८, महाराष्ट्र ११, ओडिशा ४, तेलंगणा १७, उत्तर प्रदेश १३, पश्चिम बंगाल ८, बिहार ५, जम्मू काश्मीर १, अशा ९६ जागांचा समावेश आहे. सोबतच आंध्र प्रदेश विधानसभेच्या १७५ जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.
(हेही वाचा – BJP ला मतदान करणार म्हणणाऱ्याची समाजवादी पक्षाच्या समर्थकाकडून हत्या)
महाराष्ट्रातील प्रमुख लढती
पुणे – भाजप मुरलीधर मोहोळ विरुद्ध कॉंग्रेस रविंद्र धंगेकर
बीड – भाजप पंकजा मुंडे विरुद्ध शरद पवार गटाचे बजरंग सोनावणे
शिरुर – शरद पवार गटाचे अमोल कोल्हे विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे शिवाजीराव आढळराव पाटील
छत्रपती संभाजीनगर – शिवसेनेचे संदिपान भुमरे – उबाठा गटाचे चंद्रकांत खैरे – एआयएमआयएमचे इम्तियाज जलील (Imtiaz Jalil)
जालना – भाजपाचे रावसाहेब दानवे विरुद्ध कॉंग्रेसचे कल्याण काळे
नगर – भाजपाचे सुजय विखे-पाटील विरुद्ध शरद पवार गटाचे नीलेश लंके
मावळ – शिंदे गटाचे श्रीरंग बारणे विरुद्ध ठाकरे गटाचे संजोग वाघेरे
शिर्डी – शिंदे गटाचे सदाशिव लोखंडे – ठाकरे गटाचे भाऊसाहेब वाकचौरे – वंचित बहुजन आघाडीच्या उत्कर्षा रुपवते
रावेर – भाजपाच्या रक्षा खडसे विरुद्ध शरद पवार गटाचे श्रीराम पाटील
चौथ्या टप्प्यात अखिलेश यादव, केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह, नित्यानंद राय, काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी, एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी, आंध्र प्रदेश काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष वाय. एस. शर्मिला आदी नेते रिंगणात आहेत.
सर्वाधिक आणि सर्वात कमी संपत्ती असलेले उमेदवार
चौथ्या टप्प्यात आंध्र प्रदेशातील गुंटूर मतदारसंघातून निवडणूक लढवणारे टीडीपीचे डॉ. चंद्रशेखर पेम्मासानी हे सर्वात श्रीमंत उमेदवार आहेत. पेम्मासानी यांनी त्यांची एकूण संपत्ती ५७०५ कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचे घोषित केले आहे. दुसरीकडे सर्वात गरीब उमेदवार आंध्र प्रदेशातीलच अपक्ष उमेदवार कट्टा आनंद बाबू आहेत, ज्यांनी प्रतिज्ञापत्रात आपली एकूण संपत्ती फक्त ७ रुपये असल्याचे घोषित केले आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील मावळमधून निवडणूक लढवणारे संतोष उबाळे यांनी ८३ रुपये, तर विकास रोहिदास भोर यांनी ९० रुपयांची संपत्ती जाहीर केली आहे.
चौथ्या टप्प्यात भाजपच्या ७० उमेदवारांपैकी ६५ म्हणजे ९३ टक्के उमेदवार कोट्यधीश आहेत. तर काँग्रेसचे ५६ उमेदवार करोडपती आहेत. दुसरीकडे, शिवसेना (उबाठा), बिजू जनता दल, राष्ट्रीय जनता दल, टीडीपी, भारत राष्ट्र समिती आणि शिवसेनेने (शिंदे गट) उभे केलेले सर्व उमेदवार करोडपती आहेत. (Loksabha Election 2024)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community