मुंबई / लोकसभा निवडणुकी (Lok Sabha Election 2024) दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मुंबई पोलिसांनी कंबर कसली आहे. मतदान सुरळीत पार पडावे यासाठी मुंबईत मुंबई शहरासह उपनगरात कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मुंबईत ४० हजार पोलिसांचा फौजफाटा सोमवारी बंदोबस्त कामी तैनात करण्यात आला आहे. मुंबई पोलिस दलातील २५ हजार इतकं मनुष्यबळ त्यासोबत केंद्रीय निमलष्करी दलाच्या ३६ तुकड्या, राज्य राखीव दल, दंगल नियंत्रण पथक आणि ६२०० होमगार्ड पोलिसांसोबत मतदानाच्या दिवशी बंदोबस्त कामी असतील अशी माहिती एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिली.
मुंबईमध्ये मतदान शांततेत आणि सुरळीत पार पडण्यासाठी मुंबई पोलिसांनी जय्यत तयारी केली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसेच मतदानाला गालबोट लागू नये म्हणून मुंबई पोलिसांनी संवेदनशील विभागामध्ये विशेष लक्ष केंद्रित केले आहे. मागील काही दिवसांपासून मुंबईत पोलिसांकडून प्रतिबंधक कारवाया करण्यात आलेल्या आहेत. मुंबईसह उपनगरातून मोठ्या प्रमाणात शस्त्रे जप्त करण्यात आलेली असून अभिलेखावरील गुन्हेगारांना शहराच्या बाहेर तडीपार करण्यात आले. तसेच समाजकंटकाना समज देण्यात आली आहे. मुंबईतील संवेदनशील मतदान केंद्रावर अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. मतदान केंद्रात कुठल्याही प्रकारची गडबड होऊ नये म्हणून मतदान केंद्राच्या शंभर मीटर परिसरात अधिक खबरदारी घेण्यात येणार आहे. दंगल नियंत्रण पथकाला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मुंबईचे पोलिस आयुक्त विवेक फणसळकर, विशेष पोलिस आयुक्त देवेन भारती, कायदा आणि सुव्यवस्था सांभाळणारे सहआयुक्त सत्यनारायण चौधरी या अधिकाऱ्यांच्या प्रत्यक्ष देखरेखीखाली संपूर्ण मुंबईत पोलिस काम कर्तव्य बजावणार आहेत. कुणीही कायदा आणि सुव्यवस्था बिघडेल असे कृत्य करू नये असे आवाहन मुंबई पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे. (Lok Sabha Election 2024)
(हेही वाचा – T20 World Cup 2024 : आयसीसीकडून सराव सामन्यांचं वेळापत्रक जाहीर, भारताचा एकमेव सराव सामना)
मुंबई पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. एकुण २७५२ पोलीस अधिकारी, २७४६० पोलीस अंमलदार, ६२०० होमगार्ड, ०३ दंगल नियंत्रण पथक, ३६ केंद्रिय सुरक्षा दल बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत. १६ मे पासून आतापर्यंत विविध कायद्याअंतर्गत मुंबई पोलिसांनी ८०८८ लोकांवर प्रभावीपणे प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. तसेच, मतदान केंद्र परिसराच्या १०० मीटर परिसरात आणि मतदान केंद्राच्या आत मोबाईल फोन वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे. नागरिकांनी नियमांचे पालन करत मुंबई पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहनही मुंबई पोलिसांनी केले आहे. (Lok Sabha Election 2024)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community