Lok Sabha Election : मुस्लिम समाजाने उबाठाकडे फिरवली पाठ… 

मुस्लिमबहुल मुंबादेवी विधानसभा मतदारसंघात सायंकाळी ५ वाजेपर्यंत ४६.७७ टक्के तर भायखळा विधानसभा मतदारसंघात ४१.३० टक्के मतदान नोंदवले गेले, त्याचा फटका उबाठाला बसण्याची शक्यता आहे.

303

लोकसभा निवडणूक २०२४ (Lok Sabha Election) च्या पाचव्या टप्प्यात राज्यात झालेल्या मतदानात मुस्लिमबहुल विधानसभा क्षेत्रात तुलनेने मतदान कमी झाल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. हे कमी मतदान कॉँग्रेस आणि विशेषतः शिवसेना उबाठाच्या मुंबईतील उमेदवारांना ‘घरी’ बसवणार, अशी चिन्हे दिसू लागली आहेत. उबाठाने हिंदुत्व सोडल्यानंतर त्यांची भिस्त मुस्लिम मतदारांवर होती मात्र त्यांनी उबाठाकडे पाठ फिरवली.

ईव्हीएम आणि निवडणूक प्रक्रियेवर आरोप 

मुस्लिम समाज कॉँग्रेसपेक्षा उबाठाच्या जवळ गेल्याची चर्चाही राजकीय वर्तुळात होत होती. मुंबईतील भायखळा, मुंबादेवी, वांद्रे पूर्व, मानखुर्द-शिवाजी नगर, मालाड-मालवणी अशा काही भागात संध्याकाळी ५ वाजेपर्यंत तुलनेने कमी मतदान झाल्यामुळे शिवसेना उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे, प्रवक्ते संजय राऊत यांनी पराभवासाठी ईव्हीएम आणि निवडणूक प्रक्रियेवर आरोप करून पार्श्वभूमी तयार करण्यास सुरुवात केली.

फटका उबाठाला

दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात (Lok Sabha Election) भायखळा आणि मुंबादेवी हे दोन विधानसभा क्षेत्र येतात. मोहम्मद अली रोड, भेंडी बाजार, घोडबंदर असे मुस्लिमबहुल विभाग दक्षिण मुंबईत येतात. यातील मुंबादेवी विधानसभा मतदारसंघात सायंकाळी ५ वाजेपर्यंत ४६.७७ टक्के तर भायखळा विधानसभा मतदारसंघात ४१.३० टक्के मतदान नोंदवले गेले, त्याचा फटका उबाठाला बसण्याची शक्यता आहे. दक्षिण मुंबईत शिवसेना (शिंदे) उमेदवार यामिनी जाधव विरुद्ध शिवसेना उबाठा गटाचे अरविंद सावंत अशी थेट लढत आहे.

(हेही वाचा आठ वेळा बोगस Voting झालेल्या मतदान केंद्रावर पुन्हा होणार मतदान)

निर्णायक भूमिका

वांद्रे पूर्वेकडील बेहाराम पाडा, खेरवाडी आणि भारत नगर हे भाग विधानसभा निवडणुकीत निर्णायक भूमिका बजावताना दिसतात. त्यामुळे लोकसभेसाठीदेखील या भागातील मतदान कॉँग्रेससाठी नेहमीच फायदेशीर ठरले आहे. कॉँग्रेस नेते दिवंगत सुनील दत्त याच मतांवर तब्बल पाच वेळा निवडून आले होते, अशी चर्चा विभागात होते. आज २० मे रोजी, या मुंबई उत्तर-मध्य लोकसभा मतदारसंघात (Lok Sabha Election) कॉँग्रेसच्या वर्षा गायकवाड विरुद्ध भाजपाचे उज्ज्वल निकम अशी लढत झाली.

आज-ना-उद्या भाजपासोबत जाऊ शकतात

मुस्लिम समाजाला उबाठा जवळचा मित्र वाटत असला तरी ही तात्पुरती स्थिति आहे. कॉँग्रेसवर नाराज असल्याने भाजपावर सडेतोड टीका करणारे उद्धव ठाकरे यांच्यावर समाज खुश आहे. पण याचा अर्थ समाज त्यांना मतदान करणार नाहीत कारण ठाकरे आज-ना-उद्या भाजपासोबत जाऊ शकतात, याची खात्री त्यांना असल्याचे एका कॉँग्रेस नेत्याने सांगितले.

मानखुर्द-शिवाजी नगर ४२.८२ टक्के

मानखुर्द-शिवाजी नगर या विधानसभा भागातही जिथे समाजवादी पक्षाची थोडी ताकद आहे, अशा भागात फक्त ४२.८२ टक्के मतदान सायंकाळी ५ वाजेपर्यंत झाल्याची नोंद आहे. हा विधानसभा मतदारसंघ ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात (Lok Sabha Election) असून तिथे शिवसेना उबाठा गटाचे संजय दिना पाटील तर भाजपाचे मिहिर कोटेचा निवडणूक रिंगणात आहेत.

मालाड मालवणीतही कमी मतदान

तसेच मालाड पश्चिम भागात विशेषतः मालवणी ज्या विधानसभा क्षेत्राचे प्रतिनिधित्व कॉँग्रेसचे आमदार अस्लम शेख करत आहेत, त्या भागातही ४४.४२ टक्के मतदान झाल्याची नोंद सायंकाळी ५ वाजेपर्यंत आहे. या मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघात भाजपाकडून केंद्रीय मंत्री पीयूष गोयल महायुतीचे उमेदवार आहेत तर कॉँग्रेसकडून जिल्हाध्यक्ष भूषण पाटील महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.