कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने सत्ताधारी भाजपचा दारुण पराभव केला आहे. कर्नाटकमधील काँग्रेसच्या या विजयानंतर इतर राज्यातील विरोधी पक्षांनी आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोर्चेबांधणी सुरू केली आहे. भाजपाविरोधी पक्षांना एकत्र करून राजकीय समीकरण आखली जात आहेत. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातही राजकीय हालचालींना वेग आला आहे.
महाराष्ट्रातील आगामी विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका विचारत घेत महाविकास आघाडीकडून बैठका घेतल्या जात आहे. यानंतर आता तिन्ही पक्षांच्या जागा वाटपाबद्दल वेगवेगळे तर्क-वितर्क लावले जात आहेत. दरम्यान, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जागावाटपाबद्दल मोठे विधान केले. आमचे लोकसभेत १९ खासदार राहतील. आम्ही त्या जिंकलेल्या जागा आहेत. तो आमचा आकडा कायम राहील, असे विधान संजय राऊतांनी केले. राऊतांच्या या विधानावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “जागा वाटपावर अद्याप कोणतीही चर्चा झाली नाही. त्याला अजून अवकाश आहे. संजय राऊतांना त्यांच्या पक्षाची भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. प्रत्येकाला असा अधिकार आहे. आम्ही एकत्र बसू आणि यावर सामंजस्याने मार्ग काढू, अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली.
Join Our WhatsApp Community