नगराळेंनी सुरू केली मुंबई पोलिस दलात ‘झाडाझडती’!

मुंबई गुन्हे शाखेत प्रथमच एकाच वेळी एवढ्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असल्यामुळे पोलिस दलात चर्चेचा विषय बनला आहे.

96

मुकेश अंबानी स्फोटके प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात मुंबई पोलिस दलाच्या प्रतिमेला धक्का बसला आहे. असे असतानाच तत्कालीन पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या १०० कोटी रुपयांचा कथित बॉंब फोडून, उरल्या सुरल्या मुंबई पोलिसांची प्रतिमेला आणखीनच तडा गेला. जनमानसातील मुंबई पोलिसांची प्रतिमा सुधारण्यासाठी मुंबई पोलिस दलाचे नवनियुक्त पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांनी पोलिस दलात झाडाझडती सुरू केली आहे. याचा परिणाम म्हणून मुंबई गुन्हे शाखेच्या ६५ अधिकाऱ्यांसह ८६ जणांची विविध पोलिस ठाणे आणि साईड ब्रँचला बदली करण्याचे आदेश काढले आहेत. मुंबई गुन्हे शाखेत प्रथमच एकाच वेळी एवढ्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असल्यामुळे पोलिस दलात चर्चेचा विषय बनला आहे.

त्या तिघांच्याही बदल्या

बदली करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांमध्ये मुकेश अंबानी स्फोटके प्रकरणात चौकशीच्या फेऱ्यात अडकलेले, सहाय्यक पोलिस निरीक्षक रियाजुद्दीन काझी, प्रकाश ओव्हाळ आणि सुनील माने यांचा समावेश आहे. रियाजुद्दीन काझी यांची रवानगी सीआययु मधून सशस्त्र पोलिस दल येथे करण्यात आली आहे. तर सुनील माने यांना मुलुंड पोलिस ठाण्याचा रस्ता दाखवण्यात आला आहे. प्रकाश ओव्हाळ यांची मलबार हिल पोलिस ठाणे येथे बदली करण्यात आली आहे.

(हेही वाचाः अनिल देशमुख प्रकरणात ‘ही’ आहे शिवसेनेची भूमिका!)

सुक्या बरोबर ओलंही ‘जळले’

पोलिस आयुक्तांनी मुंबई गुन्हे शाखेच्या जवळपास ६५ जणांची बदली केली. त्यात काही युनिटच्या प्रभारींचा देखील समावेश आहे. युनिट-३चे प्रभारी अजय सावंत, युनिट-१चे चिमाजी आढाव, युनिट ४चे निनाद सावंत, युनिट ५चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जगदीश साईल, युनिट १०चे विनय घोरपडे, खंडणी विरोधी पथकाचे प्रभारी सचिन कदम, मालमत्ता कक्ष केदार पवार, युनिट ९चे नंदकुमार गोपाळे या मातब्बर अधिकऱ्यांसह समाज सेवा शाखेचे प्रभारी संदेश रेवळे, प्रभा राऊळ, अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. हे अधिकारी वर्षानुवर्षे गुन्हे शाखेत कार्यरत होते तसेच, चांगले तपास अधिकारी म्हणून त्यांचे नाव देखील पोलिस दलात होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.