भाजपमुळे इतर पक्षांच्या माजी नगरसेवकांना प्रत्येकी तीन कोटींच्या विकास कामांची लॉटरी?

141

मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पात भाजप नगरसेवकांच्या प्रभागात प्रत्येकी ३ कोटी रुपयांची तरतूद पायाभूत विकास कामासाठी करण्यात आल्याने इतर पक्षांच्या नगरसेवकांच्या प्रभागांमध्येही प्रत्येकी ३ कोटींची तरतूद केली जाणार आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पक्ष आणि तत्कालीन उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या माजी नगरसेवकांनी केलेल्या मागणीनुसार आताआयुक्त व प्रशासक इक्बालसिंह चहल यांनी ही तरतूद करण्याचा निर्णय घेतला आहे.

( हेही वाचा : स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या आत्मार्पण दिनानिमित्ताने संघाकडून मानवंदना  )

मुंबई महानगरपालिकेच्या सन २०२३-२४ च्या अर्थसंकल्पीय अंदाजासंदर्भात भारतीय जनता पार्टीचे माजी गटनेते प्रभाकर शिंदे, यांनी २३ जानेवारी २०२३ रोजी मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक, यांच्याकडे पत्र सादर केले. या पत्रामध्ये ७७ नगरसेवकांच्या आणि २ नामनिर्देशित नगरसेवकांच्या प्रभागातील विविध नागरी कामासाठी सन २०२३-२४ च्या अर्थसंकल्पात प्रत्येकी ३ कोटी रुपये एवढ्या निधीची तरतूद करावी, या आशयाची मागणी केली होती. त्यानुसार भाजपच्या नगरसेवकांच्या प्रभागात प्रत्येकी ३ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद प्रशासकांनी तरतूद केली, परंतु इतर १५० नगरसेवकांनी ही मागणी न केल्याने प्रशासनाने भाजपच्या नगरसेवकांप्रमाणे प्रत्येकी तीन कोटींची तरतूद केली नव्हती.

त्यानंतर माजी सभागृह नेत्या विशाखा राऊत, माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या स्वाक्षरीने ९० नगरसेवकांच्या प्रभागात ३ कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली. तसेच माजी विरोधी पक्षनेते रवी राजा, राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी गटनेत्या राखी जाधव, समाजवादी पक्षाचे माजी गटनेते रईस शेख आदींनी आपल्या पक्षाच्या नगरसेवकांच्या प्रभागात प्रत्येकी तीन कोटी रुपयांची तरतूद करण्याची मागणी केली.

महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याबाबत बोलताना, भाजप नंतर इतर पक्षांनी आपल्या नगरसेवकांच्या प्रभागात प्रत्येकी तीन कोटी रुपयांची तरतूद करण्याची मागणी केली आहे, त्यांची पत्रे प्राप्त झाली आहेत. त्यामुळे भाजप प्रमाणे इतर पक्षाच्या नगरसेवक प्रभागात प्रत्येकी तीन कोटी रुपयांची तरतूद करण्यात येत आहे. स्थायी समिती(प्रशासक) यांना मान्यता देणार असल्याची माहिती मिळत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.