मशिदींवरील भोंग्याच्या वादात जर कुणाचा फायदा झाला असेल तर तो मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा झाला आहे. राज ठाकरेंच्या भूमिकेचा शिवसेनेसह भाजपालाही धक्का बसला आहे. राज ठाकरेंनी पुढील राजकीय पावले योग्य टाकली तर सगळ्या महापालिकांमध्ये मनसेचे ४-५ नगरसेवक दिसतील, असे भाकीत वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केले.
भोंग्याच्या वादाचा फटका भाजपलाही
राज ठाकरे यांनी जो मशिदींवरील भोंग्यांचा मुद्दा काढला आहे, त्याचा भाजपावरही परिणाम होणार आहे. अन्यथा राज ठाकरेंच्या भूमिकेचा भाजपाला धक्का लागला नसता तर देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांच्या औरंगाबाद येथील सभेच्या दिवशीच मुंबईत सभा का घेतली?, असा सवालही प्रकाश आंबेडकरांनी केला. राज ठाकरे यांच्या आवाहनानंतर मशिदींवरील तसेच मंदिरावरील भोंगेही उतरवण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाचे पालन करत भोंगे खाली उतरवलेच पाहिजेत, असे राज म्हणाले. राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर मनसेच्या २८ हजार कार्यकर्त्यांना प्रतिबंधात्मक नोटीस आणि तडीपारी कारवाई करण्यात आली. राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर राज्यातील बहुतांश मशिदीमध्ये पहाटेची अजान भोंग्याविना घ्यावी लागत आहे. तसेच अनेक ठिकाणी आवाज कमी झाल्याचे दिसून येत आहे. राज ठाकरेंनी घेतलेला हिंदुत्वाचा मुद्दा शिवसेनेसाठी जड जाण्याची शक्यता आहे, अशी चर्चा सुरु असताना प्रकाश आंबेडकर यांनी हे वक्तव्य केले.
(हेही वाचा बेस्ट ‘बदली’ बस चालकांचा वाहकाचे काम करण्यास विरोध!)
Join Our WhatsApp Community