नाशिकचे तत्कालीन पोलीस आयुक्त दिपक पांडेय यांचा भोंग्याबाबतचा मनाई आदेश नवनियुक्त पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी रद्द केला आहे. भोंग्याबाबत शहरातील सर्व परिस्थिती लक्षात घेता स्वतंत्र आदेशाची गरज नसल्याचे मत नवे पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी व्यक्त केले आहे. भोंग्यासंदर्भात महाराष्ट्र शासन जो निर्णय घेणार आहे, त्याची अंमलबजावणी केली जाणार असल्याचे पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे यांचे मत आहे. दरम्यान, १७ एप्रिल दिवशी दिपक पांडेय यांनी भोंग्याविषयी मनाई आदेश जारी करण्यात आला होता.
(हेही वाचा – INS Vikrant प्रकरण: सोमय्या आणि मुलाला उच्च न्यायालयाचा दिलासा)
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे उतरले नाही तर त्या समोरच हनुमान चालीसा लावा, असे आदेश जाहीर सभेतून दिले होते. यानंतर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले. या वादाला धार्मिक रूप आल्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून भोंग्यांपासून राजकारण सुरु असताना नाशिकचे तत्कालीन पोलीस आयुक्त दिपक पांडेय यांनी भोंगे लावण्याबाबत आदेश काढले होते.
काय होते दीपक पांडेय यांचे आदेश
- नाशिकच्या तत्कालीन पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी भोंगे लावण्यासाठी परवानगी अनिवार्य केली होती. यानुसार, ३ मे पर्यंत मशिदच नव्हे तर सर्वच धार्मिक स्थळांवरच्या भोंग्यांची परवानगी अनिवार्य असून ३ मे नंतर कारवाईला सामोरे जावे लागणार होते.
- तसेच येत्या ३ मे पर्यंत अल्टीमेटमदेखील दिला होता. यानंतर ठिकठिकाणी पोलीस कर्मचाऱ्यांचे एक पथक डेसिबल मोजत होते. त्यांच्या या निर्णयामुळे नाराजीचा सुरु होता.
- कोणाला हनुमान चालीसा लावायची असल्यास पोलीस आयुक्तांची परवानगी आवश्यक होती.
- अजानवेळी मशिदीच्या १०० मीटर परिसरात हनुमान चालीसा म्हणण्यास परवानगी नाही.
नाशिक पोलीस आयुक्तालयाने काढलेला आदेश
नाशिकचे तत्कालीन पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांच्या या आदेशामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली होती. नाशिकमध्ये सर्वच प्रार्थनास्थळावर भोंग्यांना पोलिसांची परवानगी घ्यावी लागणार होती. ३ मे पर्यंत मशीदच नव्हे, तर सर्व धार्मिक स्थळावर भोंग्यांची परवानगी घ्यावी लागणार होती. ध्वनीक्षेपकाविषयी सर्वोच्च न्यायलयाच्या आदेशाचे पालन करण्यात येणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने हा दिलेला आदेश आणि यानुसार राज्य सरकारचे आदेशनुसार भोंग्याच्या आवाजाची पातळी ठरवण्यात आली आहे. या भोंग्याच्या आवाजाची पातळी औद्योगिक, निवासी, व्यावसायिक, शांतता क्षेत्रासाठी निश्चित करण्यात आली आहे, असे पांडेय यांनी काढलेल्या आदेशात सांगितले होते.
या आदेशानुसार परवानगी न घेता भोंगा लावल्यास ४ महिने ते १ महिन्यापर्यंत कारावासाची शिक्षा तसेच कैद अशी शिक्षा होऊ शकते. तसेच हनुमान चालीसा पठण हे कुठे करावे याचीही मर्यादा या आदेशान्वये घालून देण्यात आली आहे. परवानगी घेणाऱ्यांना हनुमान चालीसेचे पठन हे अजानच्या १५ मिनिटे आधी किंवा १५ मिनिटे नंतर अशा पद्धतीने करता येणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले होते.
Join Our WhatsApp Community