लव्ह जिहादच्या मुद्द्यावरून विधानसभेत शुक्रवारी प्रचंड गदारोळ झाला. जितेंद्र आव्हाड यांनी मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यावर चुकीची माहिती दिल्याचा आरोप केला. या प्रकरणी लोढांनी माफी मागावी, अशी मागणी अबू आझमी यांनी केली. तर आशिष शेलार यांनी लव्ह जिहादवर चर्चा करा. यावर कायदा आणा, अशी मागणी केली.
( हेही वाचा : महापालिका प्रशासनाला इलेक्ट्रिक वाहनांचा विसर, पुन्हा डिझेलच्या १२ वाहनांची खरेदी )
जितेंद्र आव्हाड म्हणाले की, मंगलप्रभात लोढा यांनी गुरुवारी चर्चा करताना चुकीचा आकडा नोंदीवर आणला. एक लाख लव्ह जिहादची प्रकरणे घडल्याचे ते म्हणाले. मात्र, माझ्याकडे आकडेवारी आहे. त्यानुसार ३ हजार ४९३ इंटरफेथ प्रकरणे घडली. ते त्याला लव्ह जिहाद म्हणतात. एका मंत्र्याने इतकी चुकीची माहिती देऊन समाजामध्ये दुफळी निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये, असा आरोपही त्यांनी केला.
यावर आमदार योगेश सागर यांनी आक्षेप घेत, लव्ह जिहाद प्रकरणाचा संबंध सभागृहातील कुठल्याही सदस्याशी नाही. लोढा यांनी कुठल्याही धर्माचा उल्लेख केला नाही. कुठल्या संप्रदायाचा उल्लेख केला नाही. एखादा विषय आला, की आपल्याला त्या समाजाचा किती पुळका आहे, हे वारंवार जर या सभागृहास निदर्शनास आणून देणार असतील, तर तो संदर्भ सव्वालाख असेल की, तीन हजार असेल. त्याचा काय संबंध? हे बाजू कुणाची घेत आहेत? कोणाची वकिली कोणाची करत आहेत, असा सवाल त्यांनी केला.
लव्ह जिहादवर कायदा आणा
आशिष शेलार म्हणाले, अशा पद्धतीने मंत्र्यांवर हेतू आरोप करायचा असेल, तर त्यांना नोटीस दिली पाहिजे. लव्ह जिहादच्या बाबतीमध्ये चर्चा करायची असेल, तर करू, आम्ही घाबरत नाही. हिंदू मुलींवर अन्याय, अत्याचार करणारा लव्ह जिहाद आहे. लव्ह जिहादवर कायदा आलाच पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.
Join Our WhatsApp Community