मनसेच्या आगामी १ मे रोजी होणारी औरंगाबादेतील सभा आणि अयोध्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी पदाधिकाऱ्यांची महत्वाची बैठक झाली. या बैठकीत पक्षाच्या आगामी कार्यक्रमांबाबत सविस्तर चर्चा झाली, अशी माहिती मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी माध्यमांना दिली. यावेळी मुंबईसह नाशिक, ठाणे, पुण्यातील प्रमुख पदाधिकारी बैठकीस उपस्थित होते.
मनसे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत निर्णय
येत्या ३ मे रोजी मनसेकडून राज्यभर महाआरती आणि हनुमान चालिसाचे पठण करण्यात येणार आहे. ३ मे रोजी ईद असली तरी त्याच दिवशी अक्षय्य तृतीया देखील आहे. त्यामुळे त्या दिवशी राज्यात महाआरतीसह चालिसा पठणाचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली शिवतीर्थावर मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यावेळी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली आहे. यासह ते असेही म्हणाले, औरंगाबादच्या सभेची तयारी सुरू असून अयोध्येतील दौऱ्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. याबाबत पदाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार कार्यकर्ते कामाला लगतील.
(हेही वाचा – भारीच! ‘लालपरी’चे तिकीट दाखवा अन् मोफत नेत्रतपासणी करून घ्या!)
काय म्हणाले नांदगावकर?
१ मे रोजी होणाऱ्या औरंगाबादच्या सभेसाठी सगळी तयारी करण्यात आली आहे. त्याचबरोबर अयोध्येच्या ५ जूनच्या दौऱ्यावर राज ठाकरे जाणार आहेत. त्याचीही सगळी तयारी करण्यात आली आहे. राज ठाकरेंच्या सभांसाठी आम्ही रेकी करून आलो आहोत. कशा पद्धतीने काय करायचे? हे आम्ही ठरवत आहोत. अयोध्येसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. राज ठाकरेंना केंद्र सरकरकडून अतिरिक्त सुरक्षा पुरवली जाण्याची चर्चा होती. या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेच्या बाबतीत राज्याच्या गृहमंत्र्याना आम्ही पत्र लिहिले आहे, असेही यावेळी नांदगावकर यांनी सांगितले. दरम्यान, मशिदीवरील भोंग्यांबाबत ३ मे रोजीच्या मनसेच्या अल्टिमेटमवर सरकारच्या गाईडलाईन्स आल्यानंतर आम्ही आमचा अजेंडा ठरवणार आहोत, असेही यावेळी नांदगावकर यांनी सांगितले आहे.
Join Our WhatsApp Community