ट्रायडेंटमध्ये ‘मविआ’चे शक्तिप्रदर्शन, १२ अपक्ष आमदार उपस्थितीत राहिल्याचा दावा

सप, बविआ, एमआयएमची बैठकीकडे पाठ

91

राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचंड वेगाने घटना घडू लागल्या आहेत. मंगळवारी, ७ जून २०२२ रोजी सर्वांच्या नजर हॉटेल ट्रायडेंटकडे वळल्या होत्या. कारण या ठिकाणी महाविकास आघाडीच्या शिवसेना आणि दोन्ही काँग्रेसच्या आमदारांची बैठक होती. त्यामध्ये १२ अपक्ष आमदारांनीही हजेरी लावल्याचा दावा महाविकास आघाडीने केला आहे. राज्यसभेच्या ६ जागांसाठी १० जून रोजी मतदान होणार आहे. या रणांगणात सात उमेदवार उतरले आहेत. यातील महाविकास आघाडीचे उमेदवार संजय पवार आणि भाजपचे उमेदवार धनंजय महाडिक यांना निवडून येण्यासाठी अपक्ष आमदारांच्या मतांची गरज लागणार आहे.

समान किमान कार्यक्रमावर आणखी भर दिला जाणार

सध्या शिवसेनेच्या आमदारांना ट्रायडेंटमध्ये ठेवण्यात आले आहे. तर भाजपच्या आमदारांना ताज हॉटेलमध्ये ठेवण्यात आले आहे. काँग्रेसने त्यांच्या आमदारांना हॉटेल वेस्टईन येथे ठेवण्यात आले आहे, तर राष्ट्रवादीने अद्याप हॉटेल बुक केले नाही. महाविकास आघाडीच्या सर्व आमदारांची हॉटेल ट्रायडेंटमध्ये बैठक झाली. त्यावेळी १२ अपक्ष आमदारांची उपस्थिती आहे, असा दावा केला. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, एनसीपी अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसचे नेते मालिकार्जून खरगे उपस्थितीत होते. या बैठकीत महाविकास आघाडीच्या चारही उमेदवारांना निवडून आणायचे आहे, समान किमान कार्यक्रमावर आणखी भर दिला जाईल. आपले ऐक्य दाखवा आणि मतदान करताना काळजी घ्या, असे आवाहन करण्यात आले. मात्र समाजवादी पक्ष, बहुजन विकास आघाडी आणि एमआयएम या तीन पक्षांच्या आमदारांनी या बैठकीकडे पाठ फिरवली.

किती अपक्ष आमदारांची गरज लागणार?

राज्यसभा निवडणुकीनंतर लगेच दहा दिवसांनी विधान परिषदेच्या दहा जागांसाठी निवडणूक होणार आहे. त्यामुळे राज्यसभेची निवडणूक ही महाविकास आघाडी आणि भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली आहे. या निवडणुकीत शिवसेनेचे दोन, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रत्येकी एक उमेदवार निवडणुकीच्या रणांगणात उतरले आहेत. या निवडणुकीत एकाही उमेदवाराचा पराभव झाला तर तो पराभव पक्षासाठी मोठा फटका मानला जाईल. त्यामुळे दोन्ही बाजूने मोर्चेबांधणी सुरु आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसकडे २६ अतिरिक्त मते आहेत. आपल्या उमेदवार निवडून आणण्यासाठी त्यांना १६ मतांची गरज आहे. तर भाजपाकडे २२ अतिरिक्त मतं असून अन्य ७ आमदारांचा पाठिंबा आहे. असे एकूण २९ मते त्यांच्याकडे आहेत. त्यामुळे भाजपला ही १३ मतांची गरज आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.