सध्या काँग्रेसमध्ये नाराजांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. काँग्रेसच्या केंद्रीय पातळीवरील नेतृत्वावर नाराजी व्यक्त करून देशपातळीवर २३ नाराजांचा स्वतंत्र गट याआधीच तयार झाला आहे. काँग्रेसमधील नाराजांची ही फौज आता महाराष्ट्रातही तयार झाली आहे. आता महाराष्ट्रातील २० नाराज आमदारांनी राज्यातील नेतृत्वाच्या विरोधात असंतोष व्यक्त केला आहे. त्यांनी स्वाक्षरीसह एक पत्र काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेस नेते राहुल गांधी, प्रियंका गांधी यांना दिले आहे. या पत्रात मात्र २८ आमदारांच्या नावांचा उल्लेख आहे. या पत्राद्वारे नाराज आमदारांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे भेटीसाठी वेळ मागितली आहे.
सोनिया गांधींकडे करणार तक्रार
अर्थसंकल्पातील निधी वाटपात राष्ट्रवादीने भेदभाव केला म्हणून महाविकास आघाडीत शिवसेनेच्या आमदारांनी उघड नाराजी व्यक्त केली. आता त्या पाठोपाठ काँग्रेसच्या नाराज आमदारांचा असंतोष उफाळून आला आहे. काँग्रेसचे २० आमदार नाराज आहेत. त्यांनी थेट सोनिया गांधी यांच्याकडे तक्रार करण्याचे ठरवले आहे. त्यासाठी या आमदारांनी सोनिया गांधी यांच्या भेटीची वेळ मागितली आहे. महामंडळ आणि दंडाधिकारी यांच्या नियुक्त्या रखडल्या आहेत, जिल्हा समित्या बनवल्या नाहीत, त्यामुळे अडीच वर्षे वाया गेल्याची भावना आमदारांमध्ये आहे. या पार्श्वभूमीवर या आमदारांनी सोनिया गांधींकडे तक्रार करायचे ठरवले आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे सर्व काँग्रेस आमदारांची नाराजी ही काँग्रेसच्या राज्यातील नेतृत्व आणि मंत्र्यांविरोधात आहे. नाराज काँग्रेस आमदारांचा आकडा हा २० पर्यंत गेली आहे. येत्या तीन तारखेला एका विशेष ट्रेनिंगसाठी ही सर्व मंडळी दिल्लीला पोहोचणार आहेत. त्यामुळे तिथे त्यांनी सोनिया आणि राहुल गांधी यांना भेटायची वेळ मागितली असल्याची माहिती आहे.
(हेही वाचा काँग्रेसमध्ये नाराजांची फौज वाढता वाढे…२३ ‘ते’ केंद्रातील २५ ‘हे’ राज्यातील)
Join Our WhatsApp Community