महाविकास आघाडीला २ वर्षे झाल्यावर आता यामध्ये शिवसेना आणि दोन्ही काँग्रेस यांच्यात रुसवा फुगवी सुरू झाली आहे. त्यातच अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना जामीन मिळत नाही, अशी चिन्हे आहेत. त्यामुळे आता अखेर या सर्व विषयावर तात्पुरता उतारा म्हणून मंत्रिमंडळात फेरबदल करण्याचा विचार महाविकास आघाडी सरकारमध्ये सुरु आहे.
गृहमंत्री खात्यावरही होणार निर्णय
गेल्या काही महिन्यापासून राज्यात महाविकास आघाडीत धुसफूस सुरु आहे. विशेष म्हणजे शिवसेनेच्या नेत्यांनी केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवायांमुळे भाजपच्या नेत्यांवर कारवाई करण्यासाठी गृहमंत्रालयाला पुरावे दिले, तरीही कारवाई होत नाही. म्हणून आता शिवसेना नाराज बनली आहे, शिवसेनेच्या नेत्यांना गृहमंत्री पद राष्ट्रवादीकडून शिवसेनेने स्वतःकडे घ्यावे, अशी मागणी होऊ लागली आहे. यावरही आता निर्णय होण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसचे नेते यांच्यात बैठक होणार आहे. या बैठकीत मंत्रिमंडळ फेरबदलावर चर्चा होण्याची शक्यता आहे. यात महाविकास आघाडीतील काही खातेबदल होणार असल्याचेही सांगण्यात येत आहे.
(हेही वाचा ‘माझ्या आणि राज ठाकरेंच्या भेटीत…’, भाजप-मनसे युतीबाबत फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं)
विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवर निर्णय
८ एप्रिल रोजी राज्यात महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक होणार आहे. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे , शरद पवार, काँग्रेसचे नाना पटोले, बाळासाहेब थोरात यांच्यासह इतर नेते उपस्थित असतील. नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यापासून हे पद रिक्त आहे. मागील २ अधिवेशनात विधानसभा अध्यक्षपदाची निवड करण्यात आली नाही. त्यामुळे या बैठकीत विधानसभा अध्यक्षपदावरही तोडगा निघण्याची शक्यता आहे. अलीकडेच गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या कारभारावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाराज असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. परंतु त्यानंतर मुख्यमंत्री कार्यालयाकडून हे वृत्त फेटाळून लावले. त्यातच निधी वाटपावरूनही महाविकास आघाडीच्या आमदारांमध्ये नाराजी आहे. सध्या मंत्री नवाब मलिक हे तुरुंगात आहेत, त्यांना जामीन मिळत नाही, त्यामुळे आता मलिक यांच्याकडील खात्यांची जबाबदारी इतर नेत्यांना द्यावी लागणार आहे, त्यावरही या बैठकीत निर्णय घेण्यात येणार आहे.
Join Our WhatsApp Community