मनसे अध्यक्ष राज ठाकरे भोंग्यांच्या मुद्द्यावर ठाम असून येत्या १ मे रोजी औरंगाबादेत जाहीर सभा घेणार आहे. राज ठाकरे यांनी याआधी घेतलेल्या सभेमध्ये महाविकास आघाडी सरकारमधील अनेक मंत्र्यांवर खोचक टीका केली होती. येत्या सभेतही ते तशीच टीका करण्याची शक्यता आहे. पण राज ठाकरे यांच्या सभांना आता महाविकास आघाडी सरकारमधील तीनही पक्ष रोखठोक प्रत्युत्तर देणार असल्याचे सांगितले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विरोधकांच्या आरोपांना उत्तर देण्यासाठी महाराष्ट्र महाविकास आघाडी सरकार ३० एप्रिलला पुण्यात जाहीर सभा घेणार आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधणाऱ्या विरोधकांना करारा जवाब मिळण्याची शक्यता आहे.
(हेही वाचा – त्र्यंबकेश्वरमधील ‘या’ गावात मोदींच्या ११२ शेळ्या अन् ९५ जनावरे)
अलका टॉकीज चौकात हा मोर्चा काढण्यात येणार
मशिदींवरील भोंगे आणि हनुमान चालिसाला उत्तर देण्यासाठी महाविकास आघाडीकडून पुण्यात जाहीर सभा आयोजित करण्यात आली असून ही सभा ३० एप्रिल रोजी पुण्यात घेण्यात येणार आहे. या विशाल सभेत महाविकास आघाडी सरकारचे तिन्ही पक्ष सहभागी होणार आहेत. पुण्यातील अलका टॉकीज चौकात हा मोर्चा काढण्यात येणार आहे. विशेष म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे देखील त्या दिवशी पुण्यात हजर असणार आहेत.
‘मविआ’ या सभेला एकजुटीने मैदानात उतरणार
मिळालेल्या माहितीनुसार, या जाहीर सभेत शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंसह अनेक मंत्री, नेते सहभागी होणार आहेत. दरम्यान, भोंग्यांसंदर्भात सातत्याने होणारे राजकीय आरोप-प्रत्यारोप, राजकीय हल्ले, हनुमान चालीसा प्रकरणावरून विरोधांकडून होणाऱ्या टीका, आरोपांवर प्रत्युत्तर देण्यासाठी महाविकास आघाडी या सभेला एकजुटीने मैदानात उतरणार आहे.
Join Our WhatsApp Community