आता आदित्य ठाकरेंच्या अयोध्या दौ-यालाही विरोध

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौ-यानंतर लगेचच शिवसेनेचे नेते व मंत्री आदित्य ठाकरे यांच्या देखील अयोध्या दौ-याची घोषणा करण्यात आली. पण राज ठाकरे यांच्या अयोध्या दौ-याला विरोध होत असतानाच आता आदित्य ठाकरे यांची अयोध्या वारी सुद्धा अडचणीत आली आहे. आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या दौ-याला आता महाराणा प्रताप सेनेने विरोध केला आहे.

काय आहे कारण?

युवासेना प्रमुख आणि शिवसेनेचे मंत्री आदित्य ठाकरे यांचा अयोध्या दौरा 10 जून रोजी प्रस्तावित आहे. पण त्यांच्या या दौ-याला महाराणा प्रताप सेनेने विरोध केला आहे. या सेनेचे संस्थापक राजवर्धन सिंह यांनी या दौ-याविरोधात आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आदित्य ठाकरे यांचे राम मंदिर भेटीसाठी अयोध्येत स्वागतच आहे. त्यांचे आजोबा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी राम मंदिरासाठी झालेल्या आंदोलनात फार मोठे योगदान दिले आहे. मात्र मुख्यमंत्री पदासाठी त्यांचं मानसिक संतुलन हे सोनियाभिमुख झाले आहे. त्यामुळे अशा लोकांना अयोध्येत येऊ देणार नाही, असा इशारा राजवर्धन सिंह यांनी दिला आहे.

(हेही वाचाः रामाच्या शरणी जाणा-याला…, राज ठाकरेंच्या अयोध्या दौ-याबाबत फडणवीसांची प्रतिक्रिया)

राज ठाकरेंच्या दौ-यालाही विरोध

जोपर्यंत मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे उत्तर भारतीयांची माफी मागत नाहीत तोपर्यंत त्यांना अयोध्येत पाऊल ठेऊ देणार नाही, अशी भूमिका भाजपचे उत्तर प्रदेशमधील खासदार ब्रिजभूषण सिंह यांनी घेतली आहे. राज ठाकरे यांनी सुरुवातीला उत्तर भारतीयांविरुद्ध घेतलेल्या भूमिकेमुळे ब्रिजभूषण सिंह नाराज आहेत. राज यांनी उत्तर भारतीयांविरुद्ध महाराष्ट्रात छेडलेल्या आंदोलनांमुळे उत्तर भारतीयांचा फार मोठा अपमान झाला आहे. त्यामुळे राज ठाकरे यांनी माफी मागावी, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा 5 जून रोजी प्रस्थापित आहे.

(हेही वाचाः राज ठाकरेंना आव्हान देणा-या भाजप खासदाराने अनेकांना ‘असमान’ दाखवलं आहे)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here