सध्या शिक्षक भरती होत असलेल्या पवित्र पोर्टलमधून बराच भ्रष्टाचार होत आहे, विनाअनुदानित शाळांकडे शिक्षक जात नाहीत, त्यामुळे हे पोर्टल बंद करावे, अशी मागणी विधान परिषदेत सदस्यांनी केली.
एमपीएससीच्या माध्यमातून भरती करा
प्रश्नोत्तराच्या तासात बोलताना आमदार कपिल पाटील म्हणाले, पवित्र पोर्टल माध्यमातून शिक्षक भरतीत भ्रष्टाचार होत आहे. त्यामुळे शिक्षकांची भरती एमपीएससीच्या माध्यमातून करावी, अशी मागणी केली. त्यावर डॉ. सुधीर तांबे म्हणाले, या पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरती होत आहे, पण विनाअनुदानित शाळांकडे शिक्षक जात नाहीत, अनुदानित शाळांसाठी हे पोर्टल चांगले आहे. म्हणून विनाअनुदानित शाळांसाठी हे पोर्टल बंद करावे. तर विक्रम काळे म्हणाले, या पोर्टलमधून शिक्षक भरती बंद करण्यात आली. अतिरिक्त शिक्षक संख्या कमी झाली आहे. याचा पटावर परिणाम झाला आहे. विज्ञानाच्या विषयासाठी भाषेचा शिक्षक पाठवला जात आहे, त्यामुळे हे पोर्टल बंद करावे.
पोर्टल चांगलेच – शालेय शिक्षण मंत्री
त्यावर शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर म्हणाले, पवित्र पोर्टल न्यायालयाच्या आदेशानुसार सुरू केले आहे. त्यामुळे हे पोर्टल बंद करता येणार नाही. या पोर्टलमध्ये १० शिक्षक उमेदवारांची सूची दिली जाते, त्यामध्ये एका शिक्षकाची निवड केली जाते, हे पोर्टल चांगले आहे, असे मंत्री केसरकर म्हणाले. त्यावर उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, या पोर्टलबाबत अनियमितता होत आहे, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे सदस्यांनी त्यांच्या या पोर्टल बाबतच्या अनियमिततेबाबत जे मुद्दे आहेत ते शालेय शिक्षण मंत्री यांच्याकडे पाठवावे आणि एका आठवड्यात त्यावर ते निर्णय घेतील, असे उपसभापती डॉ. गोऱ्हे म्हणाल्या.
Join Our WhatsApp Community