शिवसेनेतून ३९ आमदार घेवून स्वतंत्र गट तयार करणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे गटनेते स्वतः एकनाथ शिंदे आणि या गटाचे प्रतोद भरत गोगावले यांची निवड वैध असल्याचे विधान मंडळाने लेखी पत्राद्वारे कळवले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने गटनेते पदी निवड केलेले अजय चौधरी आणि प्रतोद सुनील प्रभू यांची निवड अवैध ठरली आहे.
सर्वोच्च न्यायालयात प्रकरण प्रलंबित
शिवसेनेतून ३९ आमदार घेवून एकनाथ शिंदे महाराष्ट्राबाहेर गेले होते, त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना गटनेते पदावरून हटवून त्या जागी अजय चौधरी यांची निवड केली होती. मात्र यामुळे कायदेशीर पेचप्रसंग निर्माण झाला होता. शिंदे गटाने त्यांच्याकडे दोन तृतीयांश आमदार असल्याने त्यांचा गट कायदेशीर असल्याचा दावा केला होता. त्यानुसार शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयात अजय चौधरी यांच्या निवडीला आव्हान दिले. सर्वोच्च न्यायालयाने यावरील सुनावणी ११ जुलैपर्यंत स्थगित केली आहे.
अध्यक्ष पदाच्या निवडीत शिंदे गटाकडून स्वतःचा व्हीप
मात्र या दरम्यान भाजपा आणि शिंदे गटाने राज्यपाल यांच्याकडे बहुमत चाचणी घेण्याची विनंती केली. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. दुसऱ्याच दिवशी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची आणि देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यानंतर राज्यपालांनी शिंदे गट आणि भाजपा सरकारला बहुमत सिद्ध करण्यासाठी विशेष अधिवेशन बोलावण्याचा आदेश दिला. त्यानुसार रविवार, ३ जुलै रोजी अधिवेशनात विधानसभा अध्यक्ष पदावर नव्या सरकारचे राहुल नार्वेकर यांनी निवड झाली. मात्र त्याआधी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने व्हीप काढून शिंदे गटातील आमदारांनाही पाठवला, परंतु तरीही शिंदे गटाने नार्वेकर यांना मत दिल्याने त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ठाकरेंच्या शिवसेनेने अध्यक्ष नार्वेकर यांना केली होती, त्यामुळे ठाकरेंचा व्हीप वैध की शिंदे गटाचा असा प्रश्न निर्माण झाला होता.
बहुमत चाचणीच्या वेळी ठाकरेंच्या शिवसेनेसमोर प्रश्न
मात्र रात्री विधिमंडळाने मुख्यमंत्री शिंदे आणि गोगावले यांना पत्र लिहून गटनेते पदी शिंदे आणि प्रतोद पदी गोगावले यांची निवड वैध असल्याचे कळवले आहे. त्यामुळे ४ जुलै रोजी सरकारच्या बहुमत चाचणीच्या वेळी शिंदे गटाचा व्हीप ठाकरेंच्या शिवसेनेतील १६ आमदार पाळणार का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
Join Our WhatsApp Community