रवी राणांची आमदारकी धोक्यात! काय आहे कारण?

शिवसेनेचे आशिष धर्माळे व जिल्हा प्रमुख सुनील खराटे यांनी दाखल केलेल्या याचिकेवरही मंगळवारी, १२ ऑक्टोबर रोजी सुनावणी होणार आहे. त्यामुळे या निकालावरही संपूर्ण राज्याचे लक्ष केंद्रित झाले आहे.

बडनेरा येथील आमदार रवी राणा यांनी निवडणुकीत मर्यादेपेक्षा अधिक खर्च केल्यामुळे आमदार रवी राणा यांना लोकप्रतिनिधित्व कायद्यातील कलम 10-ए अंतर्गत अपात्र ठरविण्यासाठी सुरू करण्यात आलेली कारवाई तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी भारतीय निवडणूक आयोगाला दिले.

मंगळवारी पुन्हा सुनावणी

बडनेरा मतदार संघाचे आमदार रवी राणा यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत मर्यादेपेक्षा जास्त खर्च केल्याचे स्पष्ट झाल्यामुळे त्यांची आमदारकी धोक्यात आली आहे. यासोबतच शिवसेनेचे आशिष धर्माळे व जिल्हा प्रमुख सुनील खराटे यांनी दाखल केलेल्या याचिकेवरही मंगळवारी, १२ ऑक्टोबर रोजी सुनावणी होणार आहे. त्यामुळे या निकालावर संपूर्ण राज्याचे लक्ष केंद्रित झाले आहे. यासंदर्भात मूळ तक्रारकर्ते सुनील खराटे व सुनील भालेराव यांनी याचिका दाखल केली होती. त्यावर न्यायमूर्ती सुनील शुक्रे आणि न्यायमूर्ती अनिल किलोर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. दरम्यान, आमदार राणा यांना ८ ऑक्टोबर २०२१ रोजी लोकप्रतिनिधित्व कायद्यातील कलम 10-ए अंतर्गत कारवाई सुरू करण्याची नोटीस जारी करण्यात आल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली. तसेच ही कारवाई सहा महिन्यात पूर्ण केली जाईल, असेही सांगितले. त्यानंतर न्यायालयाने हे निर्देश देऊन याचिका निकाली काढली.

(हेही वाचा : समीर वानखेडेंच्या मागे गुप्तहेर…पोलिस महासंचालकांकडे केली तक्रार)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here