Maharashtra Assembly Election 2024 : ठाण्याचा गड युती कसा राखणार?

208
Maharashtra Assembly Election 2024 : ठाण्याचा गड युती कसा राखणार?
Maharashtra Assembly Election 2024 : ठाण्याचा गड युती कसा राखणार?

सचिन धानजी, मुंबई

ठाणे जिल्ह्यात १८ विधानसभा मतदारसंघातून एकूण २४४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून या सर्व मतदारसंघांतून शेवटच्या दिवसापर्यंत ९० उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. या जिल्ह्यात शिवसेनेचे दोन खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांचा एक खासदार असून या संपूर्ण जिल्ह्यात शिवसेनेचे ६, भाजपाचे ०८, आणि राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, मनसे आणि समाजवादी पक्ष यांचे प्रत्येकी एक आमदार आहेत. या सर्व मतदारसंघांतून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केदार दिघे, गणेश नाईक, जितेंद्र आव्हाड यांचे भवितव्य अवलंबून आहे. (Maharashtra Assembly Election 2024)

(हेही वाचा – राजदीप सरदेसाई खोटारडे; Chhagan Bhujbal यांनी केले आरोपांचे खंडण)

कोपरी पाचपाखाडी मतदारसंघात शिंदेंसमोर दिघेंचे आव्हान किती ?

या विधानसभा मतदारसंघात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे निवडणूक रिंगणात असून त्यांच्यासमोर उबाठा शिवसेनेने केदार प्रकाश दिघे यांना उभे केले आहे. याशिवाय अपक्ष, मनोज तुकाराम शिंदे हे निवडणूक रिंगणात उभे आहेत. या मतदारसंघात मनसेने आपला उमेदवार दिला नसल्याने दोन्ही शिवसेनेसाठी हा मतदारसंघ लक्षणीय आहे. तसेच दोघांची प्रतिष्ठा या ठिकाणी पणाला लागलेली आहे.

कळवा मुंब्य्रात यंदा आव्हाडांसमोर आव्हान

कळवा मुंब्रा विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेस (शप) गटाचे जितेंद्र सतीश आव्हाड, राष्ट्रवादी काँग्रेसचे नजीब सुलेमान मुल्ला, मनसेचे सुशांत विलास सूर्यराव, बसपाचे संतोष भिकाजी भालेराव, वंचितचे पंढरीनाथ शिमग्या गायकवाड यांच्यात प्रमुख लढत आहे. नजिब मुल्ला हे जितेंद्र आव्हाड यांच्याच तालमीत तयार झाल्याने त्यांचे आव्हान आव्हाडांसमोर असून मुख्यमंत्री शिंदे यांच्यासाठी ही जागा महत्त्वाची आहे. मागील निवडणुकीत शिवसेनेने दीपाली सय्यदला उतरवले होते. परंतु आता शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद असल्याने आव्हाड यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि विद्यमान खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याकडून होणार आहे.

डोंबिवलीत दीपेश म्हात्रे यांच्यासमोर मोठे आव्हान

डोंबिवली विधानसभा मतदारसंघात भाजपाचे विद्यमान आमदार आणि मंत्री रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan), उबाठा शिवसेनेचे दीपेश कुंडलिक म्हात्रे यांच्यात प्रमुख आव्हान आहे. दीपेश म्हात्रे यांनी निवडणुकीपूर्वी शिवसेनेतून उबाठा शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे या मतदारसंघात धनुष्यबाण नसल्याने मशाल विरुध्द कमळ असे चिन्ह असल्याने चव्हाण यांच्यासमोर आव्हान नसले, तरीही म्हात्रे यांना होणारी छुपी मदत ही महत्त्वाची ठरणार आहे.

बेलापूर मतदारसंघातून नाईक विरुध्द म्हात्रे संघर्षात कोण होणार विजयी

बेलापूर मतदारसंघात अपक्ष विजय नाहटा, राष्ट्रवादी काँग्रेस (शप) गट संदीप गणेश नाईक बसपाचे शिवशरण मल्लिकार्जुन पुजारी, मनसेचे गजानन श्रीकृष्ण काळे, भाजपाच्या मंदा विजय म्हात्रे, वंचितचे सुनील प्रभु भोले यांच्यात प्रमुख लढत आहे. गणेश नाईक यांचे पुत्र संदीप नाईक यांनी भाजपा सोडून राष्ट्रवादी काँग्रेस (शप गटात) प्रवेश केला आणि त्यांनी विद्यमान भाजपाच्या आमदार मंदा म्हात्रे यांच्यासमोर आव्हान निर्माण केले आहे. त्यामुळे म्हात्रे विरुद्ध नाईक अशी प्रतिष्ठेची लढत असली, तरी त्यांना मनसेचे गजानन काळे आणि अपक्ष विजय नाहटा यांचे आव्हान आहे. विशेष म्हणजे या निवडणुकीत म्हात्रे आणि नाईक यांच्या नावाशी साधर्म्य असलेले अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात उभे आहेत. मंदा संजय म्हात्रे – अपक्ष, संदीप प्रकाश नाईक – अपक्ष असे दोन उमेदवार असल्याने हे अपक्ष किती मतदान पारड्यात पाडून घेतात, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

कल्याण ग्रामीण राजू पाटील यांच्यासाठी किती अनुकूल ?

कल्याण ग्रामीण विधानसभेत मनसेचे विद्यमान आमदार प्रमोद रतन पाटील, शिवसेनेचे राजेश गोवर्धन मोरे – शिवसेना, उबाठा शिवसेनेचे सुभाष गणू भोईर, वंचितचे विकास प्रकाश इंगळे यांच्यात प्रमुख लढत आहे. त्यामुळे दोन शिवसेनेच्या उमेदवारांमधील लढतीचा फायदा पुन्हा एकदा मनसेच्या राजू पाटील यांच्यावर पथ्यावर पडण्याची शक्यता आहे.

मीरा भाईंदरमध्ये पुन्हा गीता जैन अपक्ष; पण पाठिंबा कुणाचा असेल

मीरा भाईंदर विधानसभेत भाजपाने माजी आमदार नरेंद्र मेहता यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे या ठिकाणी आमदार गीता जैन यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करत त्यांच्यासमोर आव्हान निर्माण केले आहे, तर काँग्रेसचे मुझफर हुसेन, मनसेचे संदीप राणे, रिपाइं आठवले गटाच्या अरुणा राजेंद्र कोहली (चक्रे) यांचेही आव्हान आहे. मागील निवडणुकीत भाजपाने उमेदवारी न दिल्याने गीता जैन यांना शिवसेनेने पाठिंबा दिला होता आणि त्यांच्या पाठिंब्यावर जैन या अपक्ष आमदार म्हणून निवडून आल्या होत्या. त्यामुळे यंदा जैन यांचा छुपा पाठिंबा कुणाचा असा सवाल निर्माण होत आहे. यंदा मेहता आणि हुसेन यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली असताना जैन किती मते घेतात याकडेही लक्ष आहे.

ठाणे मतदारसंघात विचारेंना आता शिंदेंसमोर मनसेचेच आव्हान

या मतदारसंघात उबाठा शिवसेनेचे राजन विचारे, मनसेचे अविनाश जाधव, भाजपाचे संजय केळकर, वंचितचे नागेश गणपत जाधव यांच्यात लढत आहे. या मतदारसंघात शिवसेनेची भूमिका ही महत्त्वाची मानली जात असून शिवसेनेला विचारेंचा पराभव करून केळकर यांचे अस्तित्व संपवायचे आहे. त्यामुळे मनसेचा अविनाश जाधव यांसारख्या डॅशिंग उमेदवाराचा पर्याय समोर असल्याने एकप्रकारे विचारे आणि केळकर यांची डोकेदुखी वाढली आहे. खुद्द राज ठाकरे यांनी कार्यालयाचे उद्घटन आणि सभा घेतल्याने या मतदारसंघात मनसेला आपली ताकद दाखवण्याची वेळ आली आहे.

ऐरोली मतदारसंघात गणेश नाईक यांची प्रतिष्ठा पणाला

या मतदारसंघातून भाजपाकडून गणेश रामचंद्र नाईक, मनसेचे नीलेश अरूण बाणखेले, उबाठा शिवसेनेचे मनोहर कृष्ण मढवी, वंचितचे विक्रांत दयानंद चिकणे यांच्यात प्रमुख लढत असून नाईक यांच्यासाठी ही लढत प्रतिष्ठेची ठरलेली आहे.

भिवंडी ग्रामीणमध्ये घाटाळ विरुद्ध शांताराम मोरे

भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून ११ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले असून उबाठा शिवसेनेचे महादेव आंबो घाटाळ, मनसेच्या वनिता शशिकांत कथोरे, शिवसेनेचे शांताराम तुकाराम मोरे, वंचितचे प्रदीप दयानंद हरणे यांच्यात प्रमुख लढत आहे.

शहापूर मतदारसंघात दरोडा विरुध्द बरोरा महादू

राष्ट्रवादी काँग्रेसचे दौलत भिका दरोडा, राष्ट्रवादी काँग्रेस (शप गट) बरोरा पांडुरंग महादू, बसपाचे यशवंत गोपाळ वाख, मनसेचे हरिश्चंद्र (हॅरी) बांगो खंडवी यांच्यात लढत आहे.

भिवंडी (पश्चिम) विधानसभेत चौगुलेंविरोधात चोरघे, आजमी आणि वारीस पठाणचे आव्हान

भिवंडी पश्चिम विधानसभा मतदारसंघात भाजपाचे महेश प्रभाकर चौघुले, काँग्रेसचे दयानंद मोतीराम चोरघे, बसपाचे मोबीन सादीक शेख, सपाचे रियाज मुकीमुद्दीन आझमी, वचिंतचे जाहिद मुरब्तार अन्सारी, एआयएमआयएमचे वारिस युसूफ़ पठाण यांच्यात प्रमुख लढत आहे.

भिवंडी पूर्वमध्ये रईस शेख यांच्यासाठी विजय किती सोपा ?

या मतदारसंघात बसपाचे परशूराम रामपहट पाल, मनसेचे मनोज वामन गुळवी, शिवसेनेचे संतोष मंजय्या शेट्टी, सपाचे रईस कासम शेख यांच्यात प्रमुख लढत आहे. येथील हिंदु मतांचे विभाजन हे शेख यांच्या पथ्यावर पडणारे दिसत आहे.

कल्याण पश्चिम विधानसभेत भोईर विरुद्ध बासरे

या विधानसभा मतदारसंघात मनसेचे उल्हास महादेव भोईर, वंचितचे अय्याज गुलजार मौलवी, शिवसेनेचे विश्वनाथ आत्माराम भोईर, उबाठाचे शिवसेनेचे सचिन दिलीप बासरे, बसपाचे दीपक वानखेडे यांच्यात प्रमुख लढत आहे.

मुरबाड विधानसभेत कथोरेंना सुभाष पवारांचे आव्हान

या मतदारसंघातून भाजपाचे किसन शंकर कथोरे, राष्ट्रवादी काँग्रेस (शप गटाचे) सुभाष गोटीराम पवार, मनसेचे संगीता मोहन चेंदवणकर यांच्यात प्रमुख लढत आहे.

अंबरनाथ विधानसभेत किणीकरांसमोर वानखेडे

या विधानसभा मतदारसंघात बसपाचे किरण अशोक भालेराव, शिवसेनेचे बालाजी प्रल्हाद किणीकर, उबाठा शिवसेनेचे राजेश देवेंद्र वानखेडे, वंचितचे सुधीर पितांबर बागुल, बसपाचे सुशीला काशिनाथ कांबळे यांच्यात प्रमुख लढत आहे. या मतदारसंघात मनसेचे राजू पाटील यांनी वानखेडे यांना पाठिंबा जाहीर केल्याने शिवसेनेचे किणीकर यांच्यासमोर मोठा पेच निर्माण झाला आहे.

उल्हासनगर विधानसभेत आयलानी विरुद्ध कलानी

या मतदारसंघात भाजपाचे कुमार आयलानी, राष्ट्रवादी काँग्रेस एस गटाचे ओमेश कलानी, मनसेचे भगवान भालेराव, वंचितचे संजय गुप्ता, बसपाच्या पुजा संतोष वाल्मीकी यांच्यात प्रमुख लढता आहे.

कल्याण पूर्व मतदारसंघात सुलभा गायकवाड यांना किती सहानुभूती

या विधानसभा मतदारसंघात उबाठा शिवसेनेचे धनंजय बाबुराव बोडारे – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), बसपाचे अॅड. मिलिंद रविंद्र ढगे, भाजपाच्या वतीने सुलभा गणपत गायकवाड, वंचितचे विशाल विष्णु पावशे, रिपाइं आठवले गट शालिनी राजेंद्र वाघ, अपक्ष महेश गायकवाड यांच्यात प्रमुख लढत आहे.

ओवळा माजिवडा विधानसभेत सरनाईकांना मणेरा, पाचंगेंचे आव्हान

या मतदारसंघात शिवसेनेचे प्रताप सरनाईक, उबाठा शिवसेनेचे नरेश मणेरा, मनसेचे संदीप दिनकर पाचंगे, वंचितचे लोभसिंग गणपतराव राठोड, बसपाचे सुरेश संभाजी लोखंडे यांच्यात प्रमुख लढत आहे. (Maharashtra Assembly Election 2024)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.