Maharashtra Assembly Election Result 2024 : खरी शिवसेना कुणाची? जनतेच्या न्यायालयातही त्याच शिवसेनेला दिला कौल!

44
Maharashtra Assembly Election Result 2024 : खरी शिवसेना कुणाची? जनतेच्या न्यायालयातही त्याच शिवसेनेला दिला कौल!
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई

शिवसेना पक्ष फुटल्यानंतर खरी शिवसेना कुणाची यावरून उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून दावे, प्रतिदावे केले जात होते. त्यानंतर निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि चिन्ह हे  एकनाथ शिंदे यांना दिले. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी ‘आम्ही जनतेच्या न्यायालयात जावू, जनताच आता खरी शिवसेना कुणाची हे ठरवले’ असे म्हटले होते. या विधानसभा निवडणुकीच्या निकालानेही शिवसेना ही एकनाथ शिंदे यांचीच असल्याचे सिद्ध झाले आहे. उद्धव ठाकरेंना अपेक्षित असलेल्या जनतेच्या न्यायालयाचाही कौल एकनाथ शिंदे यांच्या बाजूने लागला आहे. (Maharashtra Assembly Election Result 2024)

या निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने ८५ जागा लढवल्या होत्या, त्यापैकी ५७ जागांवर त्यांना विजय मिळाला आहे. त्यांच्या विजयाचा स्ट्राइक हा जवळपास ६७ टक्के इतका आहे. तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाने  ९२ जागा लढवल्या होत्या त्यांना केवळ २० जागांवर विजय मिळवता आला. त्यामुळे जनतेचा कौल हा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या बाजुने राहिल्याचे स्पष्ट आहे. उबाठा शिवसेनेला जनतेने नाकारले आहे. (Maharashtra Assembly Election Result 2024)

(हेही वाचा – Niva Bupa Share Price : गेल्याच आठवड्यात शेअर बाजारात नोंदणी झालेला निवा बुपाचा शेअर कशी कामगिरी करतोय?)

जुलै २०२२मध्ये शिवसेना पक्ष फुटल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख असलेल्या उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. सर्वोच्च न्यायालयाने यासंदर्भात विधानसभा अध्यक्षांना निर्णय घेण्याचे अधिकार दिले होते. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिंदे गटाला खरी शिवसेना म्हणून मान्यता दिली. त्याविरोधात उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली, परंतु त्या याचिकेवर अजून निकाल आला नाही. त्यामुळे खरी शिवसेना कुणाची ही जनतेच्या न्यायालयात ठरेल, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले होते. त्यानुसार आता जनतेने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला पसंती दिली आहे. (Maharashtra Assembly Election Result 2024)

शिवसेना पक्ष फुटला तेव्हा शिवसेनेच्या एकूण ५५ आमदारांपैंकी ४० आमदार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले होते. तेव्हा उबाठा शिवसेनेकडे १५ आमदार होते. त्यामुळे अधिक आमदार असल्याने एकनाथ शिंदे मुख्यनेता असलेल्या शिवसेनेने आपलीच शिवसेना खरी असल्याचा दावा केला होता. तर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे ०७ आणि उबाठा शिवसेनेचे ०९ खासदार निवडून आले होते. त्यामुळे लोकसभा निवडणुकीनंतर उबाठा शिवसेनेने आत्मविश्वासाने विधान करत जनतेच्या न्यायालयातच खरी शिवसेना कोणती ही विधानसभा निवडणुकीनंतर स्पष्ट होईल असे जाहीर पत्रकार परिषदेत सांगितले होते. परंतु आता विधानसभा निवडणूकीत उबाठा शिवसेनेपेक्षा शिवसेनेचे आमदार दुपटीपेक्षा अधिक निवडून आल्याने खरी शिवसेना कुणाची हे आता जनतेनेही दाखवून दिले आहे. (Maharashtra Assembly Election Result 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.