Maharashtra Assembly Election Result : यश मिळो अथवा अपयश, Eknath Shinde यांचा कसोटीचाच काळ!

निकालानंतर यश मिळाले, तरी सोबतच्या सगळ्यांचे समाधान कसे करायचे, याची कसरत एकनाथ शिंदे यांना करावी लागेल. जर अपेक्षित यश मिळाले नाही, तर पक्षातील सगळ्यांना सोबत ठेवणे हे एक आव्हान असेल.

95
  • सुनील पाटोळे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी ही विधानसभा निवडणूक (Maharashtra Assembly Election Result) त्यांच्या राजकीय भवितव्याचा फैसला करणारी ठरणार आहे. मागच्या अडीच वर्षांत जी राजकीय उलथापालथ झाली त्याच्या केंद्रस्थानी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हेच होते. त्यामुळे एकनाथ शिंदे यांचा आत्मविश्वास कमालीचा वाढलेला आहे, स्वभाविकपणे राजकीय महत्वाकांक्षा वाढणे हे ओघाने आलेच. पुन्हा आपणच मुख्यमंत्री व्हावे, अशी इच्छा त्यांनी बाळगणे हे स्वाभाविक आहे. पण प्रत्यक्षात निकालानंतर राज्यात तशी राजकीय स्थिती निर्माण होईल का, ते पहावे लागणार आहे.

लोकप्रिय निर्णयांचा धडाका तारणार का?

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी अनेक लोकप्रिय निर्णयांचा धडाका लावला आहे. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना हा तर मास्टरस्ट्रोक आहे. नेतेगिरीचा आव न आणता स्वतःला एक कार्यकर्ता-कम-नेता असे प्रोजेक्ट करण्याचा एकनाथ शिंदे यांचा प्रयत्न राहिला आहे. त्यात ते बऱ्यापैकी यशस्वीही ठरले आहेत. लोकसभेला महायुतीमध्ये शिंदे यांच्या शिवसेनेला १५ जागा मिळाल्या होत्या, त्यातील सात जागा त्यांनी जिंकल्या. महायुतीची राज्यात झालेली पडझड पाहता शिंदेंचा हा स्ट्राइक रेट समाधानकारक होता. शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह आणि नाव हे एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. या निवडणुकीत (Maharashtra Assembly Election Result) शिंदे यांच्या या काही जमेच्या बाजू म्हणता येतील; पण या बळावर पुन्हा मुख्यमंत्री होण्याइतके यश त्यांना मिळेल का? याबाबत मात्र साशंकता आहे.

(हेही वाचा Maharashtra Election Exit Poll पहा एका क्लिकवर; महाराष्ट्रात कुणाची सत्ता येणार?)

या निवडणुकीत (Maharashtra Assembly Election Result) प्रमुख आठ पक्षांमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वाट्याला आलेल्या ८५ जागा या सातव्या क्रमांकाच्या आहेत. शेवटच्या क्रमांकावर असलेला राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ५५ जागा लढवत आहे. अशा स्थितीत राजकीय अस्थिरता निर्माण करणारे निकाल आले, तरच एकनाथ शिंदे हे मुख्य भूमिकेत येऊ शकतात, अन्यथा १४८ जागा लढवणारा भाजपा पक्ष शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री करण्याचे औदार्य दाखवण्याचे काही कारण नाही. अडीच वर्षांपूर्वी जे घडले तेव्हाची स्थिती आणि राजकीय गणिते वेगळी होती, म्हणूनच शिंदे यांना मुख्यमंत्री होता आले. आता चित्र बदलले आहे, त्यामुळे मुख्यमंत्रीपदासाठी संख्याबळाचा निकषच लावला जाईल आणि त्या निकषावर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना कोणतातरी चमत्कारच पुन्हा मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसवू शकतो.

 

WhatsApp Image 2024 11 21 at 6.34.36 PM

मतदार काय कौल देणार?

शिंदे यांना मतदार काय कौल देतात, हे निश्चित करणारी ही विधानसभा निवडणूक असेल. एसटीमध्ये ५० टक्के भाडे सवलत, मुलींना व्यावसायिक अभ्यासक्रमांत मोफत शिक्षण, कौशल्य विकास केंद्रे, विविध जातींसाठी महामंडळे, सिंचन प्रकल्पांना मान्यता, मुंबई एन्ट्री पॉईंटवर टोलमाफी, शेतकऱ्यांना मोफत वीज, युवा प्रशिक्षण योजना अशा निर्णयांचा धडाका त्यांनी लावला. ‘हे सर्वसामान्यांचे सरकार आहे.’ असे सतत सांगत शिंदे यांनी जनमनात नेत्यापेक्षा आपण कार्यकर्ताच आहोत, अशी प्रतिमा ठसवण्याचा प्रयत्न केलेला आहे. मात्र त्याचवेळी शिवसेनेतील फुटीनंतर महाविकास आघाडीने शिंदे यांची एक नकारात्मक प्रतिमा उभी केली आहे, ती पुसण्यात ते फारसे यशस्वी झालेले नाहीत. राष्ट्रवादीवर आक्षेप घेऊन बाहेर पडल्याचे जाहीरपणे सांगणारे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आज त्याच राष्ट्रवादीसोबत एकत्र नांदत आहेत. अर्थात ही त्यांची मजबुरी असेलही पण लोकांना जे दिसतेय, ते नाकारता येणारे नाही.

(हेही वाचा Maharashtra Assembly Election : सट्टा बाजारचा कौल कोणाला? महाराष्ट्रात कोणाची सत्ता येणार?)

लोकसभेचा स्ट्राइक रेट राखण्याचे आव्हान!

एकनाथ शिंदे यांना लोकसभेला ज्या स्ट्राइक रेटने यश मिळाले तोच स्ट्राइक रेट आता रहाण्याची शक्यता धूसर आहे. या वेळी मनसे हा फॅक्टर महत्त्वाचा ठरणार आहे. सभांमधून राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या ध्येय-धोरणांविषयी आक्षेप नोंदवणारी वक्तव्य केलेली आहेत. तसेच मुंबईत शिंदे यांची शिवसेना १६ जागा लढवत आहे, इथे मनसेने ११ ठिकाणी विरोधात उमेदवार दिले आहेत. ठाणे जिल्ह्यात शिवसेना लढवत असलेल्या ७ पैकी ४ ठिकाणी मनसेने विरोधात उमेदवार दिले आहेत. काही अपवाद वगळता बहुतांश ठिकाणी याचा फटका एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला बसण्याची शक्यता आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मतांची विभागणी झाली, तरी त्यांना काँग्रेस, राष्ट्रवादीची मते मिळणार आहेत. मात्र त्या प्रमाणात या ठिकाणी भाजपाची मते शिंदे यांना मिळतील का, याची खात्री देता येणारी नाही. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना भाजपाच्या नेत्यांनी स्वीकारले असले, तरी पारंपरिक मतदारांनी त्यांना अजून किती स्वीकारले आहे, हे माहिती नाही. कदाचित या निवडणुकीनंतर (Maharashtra Assembly Election Result) ते समजेलही.

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासाठी निकालानंतरही कसोटीचा काळ असणार आहे. कारण शिंदे यांच्यासोबत असलेल्या नेत्यांच्या महत्त्वाकांक्षाही फार वाढलेल्या आहेत, अडीच वर्षांचा काळ आश्वासनांवर रेटता आला. मात्र निकालानंतर यश मिळाले, तरी सोबतच्या सगळ्यांचे समाधान कसे करायचे, याची कसरत शिंदे यांना करावी लागेल. जर अपेक्षित यश मिळाले नाही, तर पक्षातील सगळ्यांना सोबत ठेवणे हे एक आव्हान असेल. (Maharashtra Assembly Election Result)

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.