- खास प्रतिनिधी
महाविकास आघाडीने प्रसिद्ध केलेल्या वर्तमान पत्रातील जाहिरातीत ‘अनाजी’ असा उल्लेख केला असून हा प्रकार म्हणजे जातीद्वेष पसरवण्याचा प्रकार असून धमक असेल तर उघड आणि स्पष्टपणे बोला आम्ही उत्तर द्यायला तयार आहोत, असे जाहीर आव्हान भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारी यांनी केले महाविकास आघाडीला दिले आहे.
फडणवीस यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीकडून १६ नोव्हेंबर २०२४ या दिवशी एक पूर्ण पान जाहिरात काही वर्तमान पत्रात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जाहिरातीत छत्रपती शिवाजी महाराज आणि काही शेतकऱ्यांचा फोटो वापरुन शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या आहेत. तसेच ‘पहिल्या अनाजीने स्वराज्याला लुटले आणि दुसऱ्याने अवघ्या महाराष्ट्राचे अन् शेतकऱ्यांचे स्वप्न उद्ध्वस्त केले’ असा मजकूर लिहित अप्रत्यक्षपणे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.
(हेही वाचा – Maharashtra Assembly Elections : ‘महाराष्ट्रामध्ये एकच राडा पंजा, मशाल, तुतारीला पाडा..’)
चिंधीचोर धंदे बस्स करा
यावर भाजपाने सडेतोड उत्तर देत आक्षेप घेतला आणि काँग्रेस, शरद पवार आणि पर्यायाने महाविकास आघाडीला आव्हानही दिले आहे. भंडारी यांनी ‘हिंदुस्थान पोस्ट’शी बोलताना हा ‘जातीयवाद आणि जातीद्वेष पसरवण्याचा प्रकार’ असल्याचे सांगत ‘हे चिंधीचोर धंदे बस्स करा’ अशा शब्दांत समाचार घेतला. तसेच शरद पवार आणि काँग्रेसचे हे विषारी, जातीद्वेषाचे उघड प्रदर्शन असल्याचा आरोप केला.
विषारी जातीद्वेष पसरविण्याचे राजकारण
भांडारी यांनी ‘X’ या समाज माध्यमावर आपली प्रतिक्रियाही व्यक्त केली आहे त्यात त्यांनी म्हटले आहे की, “आजच्या वर्तमान पत्रांमध्ये महाविकास आघाडीने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीवरून मला आश्चर्याचा धक्का बसला. कारण काल देवेंद्र फडणवीस यांनी ‘वोट जिहाद’बद्दल जे बोलले त्यावर टिका करणारे पवारांचे विधान याच वर्तमान पत्रात प्रसिद्ध झाले आहे. त्यात पवार म्हणतात की, आम्ही (भाजपा) धार्मिक ध्रुवीकरणाचा प्रयत्न करतो. वोट जिहादबद्दल बोललो की धार्मिक ध्रुवीकरण कसे होते हे मला काही कळले नाही. आणि तुमच्या जाहिरातीमध्ये जे तुम्ही ‘अनाजी’ म्हणता ते कोण? तुम्हाला कुणाबद्दल बोलायचे आहे? कोण अनाजी? आणि ‘दूसरा अनाजी’ म्हणजे कोणाबद्दल बोलायचे आहे? खोटा इतिहास लोकांसमोर ठेऊन, खोट्या गोष्टी लोकांसमोर मांडून, विषारी जातीद्वेष पसरविण्याचे राजकारण वर्षानुवर्षे तुम्ही करत आला आहात, त्यातून तुमच्या हाताला काही लागले नाही. पण अजूनही ती सवय सोडायला तयार नाही तुम्ही, अजूनही त्यात बदल करायला तयार नाही.”
भंडारी यांनी पुढे म्हटले की, “माझं महाविकास आघाडीच्या नेत्यांना आव्हान आहे, जर तुमच्यात धमक असेल तर जे बोलायचे ते स्पष्टपणे आणि जाहीरपणे बोला. तुम्हाला उत्तर द्यायला सगळे समर्थ आहेत. एकदा काय ते होऊन जाऊ द्या. पण हा विषारी जातीयवादाचा तुमचा स्वभाव सोडायचा प्रयत्न करा.”
हेही पहा –
Join Our WhatsApp Community