मे २०२४ मध्ये पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला अनपेक्षित यश मिळाल्यानंतर ‘मविआ’मधील सगळ्याच राजकीय पक्षांचा आत्मविश्वास वाढला असून विधानसभा निवडणुकीत अधिकाधिक जागा पदरात पाडून घेण्याच्या स्पर्धेत ‘मविआ’मध्ये फूट पडली आहे. याचा फटका ‘मविआ’ला विधानसभेला बसण्याची शक्यता आहे ही बाब महायुतीच्या पथ्यावर पडू शकते.
अति-महत्वाकांक्षा ‘मविआ’चा घात करणार
लोकसभा निवडणुकीत ‘इंडी’ आघाडीच्या छत्राखाली भाजपाप्रणीत ‘एनडीए’ विरोधातील सगळेच पक्ष एकत्र आले होते. आता राज्यात सत्तेची स्वप्ने पडू लागल्यानंतर विधानसभा निवडणुकीत त्यांच्यातील वाद उफाळून आला. अति-महत्वाकांक्षा ‘मविआ’चा घात करण्याची शक्यता असून यामुळे महायुतीला सत्तेचा मार्ग सुकर होण्यास मदत होईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.
(हेही वाचा – NCP Star Campaigner : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; ‘या’ बड्या नेत्याचे नाव वगळले )
माकप-सपा ‘मविआ’तून बाहेर
‘इंडी’ आघाडीतील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि समाजवादी पक्ष विधानसभा निवडणुकीत वेगळा झाला आहे. महाविकास आघाडीपासून त्यांनी फारकत घेतली असून स्वतंत्रपणे निवडणूक लढण्याची तयारी केली आहे. माकप आणि सपा या दोन्ही पक्षांनी महाविकास आघाडीत प्रत्येकी १२ जागांची मागणी केली होती, मात्र ‘मविआ’मधील काँग्रेस आणि शिवसेना उबाठा यांच्यातच जागावाटपात कुरघोडी एकमेकांवर होत असल्याने माकप आणि सपाने आपली वेगळी चूल मांडली आहे.
अखिलेश यादव दुर्लक्षित
सपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांनी गेल्या आठवड्यात मुंबईला भेट दिली मात्र ‘मविआ’ने त्यांच्याकडे सपशेल दुर्लक्ष केल्याने सपा ‘मविआ’तून बाहेर पडल्याचे दिसते.
(हेही वाचा – Abhijit Katke: डबल महाराष्ट्र केसरी अभिजीत कटकेच्या घरी आयकर विभागाची धाड!)
सपाचे उमेदवार जाहीर
माकपने राज्यात स्वबळावर निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला असून नाशिकमधील ६ जागांसह अन्य काही जागा लढण्याची शक्यता आहे. तर सपाने ५ उमेदवार घोषितही केले असून त्यांनीही आपली वेगळी चूल मांडली असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे ‘मविआ’मध्ये लहान पक्षांना स्थान नसल्याने त्याचा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.
दरम्यान, काँग्रेस-शिवसेना उबाठा यांच्यातील वाद विकोपाला गेला असून शिवसेना उबाठाने आता २८८ मतदार संघात उमेदवार देण्याची तयारी केली असल्याचीही चर्चा आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community