होय, ती माझी चूकच होती! वीर सावरकरांवरील वक्तव्यावर नितेश राणेंची कबुली  

आपण स्वतः चुकीच्या इतिहासाचे बळी ठरलो आहे, तशी पुढची पिढी ठरू नये, यासाठी आपण लोकप्रतिनिधी म्हणून निश्चित प्रयत्न करणार आहे, असे आश्वासन आमदार नितेश राणे यांनी दिले. 

95

वीर सावरकर यांच्याविषयी मला निश्चित अभिमान आहे. त्यांनी हिंदुत्व आणि राष्ट्र यांवर केलेले कार्य फार मोठे आहे. परंतु वीर सावरकर यांच्याविषयी मला २०१५ साली जी माहिती देण्यात आली होती, त्या आधारे मी ट्विट केले, जे चुकीचे होते. त्यावेळी मला मिळालेली माहिती मी पडताळून पहिली असती, तर निश्चितच माझ्याकडून वीर सावरकर यांचा अवमान झाला नसता. त्यावेळी माझ्याकडून झालेली ती चूकच होती, अशी कबुली केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे सुपुत्र आणि भाजपचे आमदार नितेश राणे यांनी दिली. ‘हिंदुस्थान पोस्ट’ला दिलेल्या ‘ऑफ बीट नितेश राणे’ या मुलाखतीत ते बोलत होते.

nitesh

…तर वीर सावरकरांविषयीचे वक्तव्य निराळे असते! 

‘हिंदुस्थान पोस्ट’चे संपादक स्वप्नील सावरकर यांनी आमदार नितेश राणे यांना त्यांनी २०१५ साली वीर सावरकर त्यांच्यासंबंधी केलेल्या ट्विटची आठवण करून दिली. त्यावेळी ‘हिंदुस्थान पोस्ट’च्या सल्लागार संपादिका मंजिरी मराठे यादेखील उपस्थित होत्या. आमदार राणे यांनी त्यावेळी ‘वीर सावरकर यांनी ब्रिटिशांकडे चार वेळा माफी मागितली होती’, अशा आशयाचे ट्विट केले होते. त्यासंबंधी बोलताना आमदार राणे म्हणाले कि, राजकीय कार्यकर्ते म्हणून आम्ही असंख्य लोकांना भेटत असतो, असंख्य लोक आम्हाला माहिती पुरवत असतात, माहिती देत असतात. तो त्यांचा अभ्यास असू शकतो. ती त्यांची मते असू शकतात. अशा मिळणाऱ्या माहितीवर आमच्यासारखे नेते मत प्रदर्शन करतात. या अनुभवातून मी एक धडा घेतला आहे. आपल्याकडे आलेली माहिती आधी पडताळून घ्यायची. वीर सावरकर यांच्या विषयी मिळालेली माहिती मी त्यावेळी पडताळली असती, तर वीर सावरकर यांच्याविषयी केलेले आपले वक्तव्य वेगळे असते. शेवटी चुकांमधूनच माणूस सुधारत असतो, तसाच तो मला अनुभव आलेला आहे, असेही आमदार नितेश राणे यांनी म्हटले.

मी चुकीच्या इतिहासाचा बळी! 

वीर सावरकर यांनी राष्ट्र आणि हिंदुत्व यांविषयी केलेले कार्य मोठे आहे. याविषयी आपल्याला निश्चित अभिमान आहे. त्यावेळी आपल्याला वीर सावरकर यांच्याविषयी जी माहिती मिळाली, त्याआधारे मी तेव्हा ट्विट केले होते. ती माझी चूकच होती. ती मी निश्चितच स्वीकारतो आणि पुढे जातो. मला जशी वीर सावरकर यांच्याविषयी चुकीची माहिती मिळाली, तशी चुकीची माहिती छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयीदेखील मिळाली होती. या महान राष्ट्रपुरुषांबद्दलचा चुकीचा इतिहास लिहिण्यात आला आहे. आपल्याकडे राष्ट्रपुरुषांचा एकच असा इतिहास लिहिण्यात आलेला नाही. विविध विचारांनी तो लिहिण्यात आल्याने चुकीचे मतप्रदर्शन केले जाते. त्यामुळे आपल्यापुढे इतिहासासंबंधी येणारी माहिती पडताळून घेणे, हाच मार्ग आहे. आपण स्वतः चुकीच्या इतिहासाचे बळी ठरलो आहे, तशी पुढची पिढी ठरू नये, यासाठी आपण लोकप्रतिनिधी म्हणून निश्चित प्रयत्न करणार आहे, असे आश्वासन आमदार नितेश राणे यांनी दिले.

संपूर्ण मुलाखत पाहण्यासाठी इथे क्लिक करा!

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.