पंढरपूर पोटनिवडणुकीमुळे भाजपला ‘संजीवनी’, फडणवीस ‘ते’ वाक्य खरे करणार का?

आता येत्या काही दिवसांत भाजपचे नेते सत्ताधाऱ्यांविरोधात रान उठवून त्यांना जेरीस आणणार आहेत.

राज्यात सर्वांच्या नजरा लागलेल्या पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा निकाल नुकताच जाहीर झाला. या निवडणुकीमध्ये भाजपचे समाधान आवताडे विजयी झाले. मात्र त्यांच्या या विजयाने भाजपला आता नव संजीवनी मिळाली असून, भाजपचे नेते आता जोरदार कामाला लागले आहेत.

विजय होताच सरकारवर हल्ला

तिन्ही पक्ष एकत्र सत्तेत असताना देखील, भाजपने आणि विशेषत: देवेंद्र फडणवीस यांनी समाधान आवताडे यांना विजयी केले. याचमुळे आता येत्या काही दिवसांत भाजपचे नेते सत्ताधाऱ्यांविरोधात रान उठवून त्यांना जेरीस आणणार आहेत. याची झलक काल निकालाचे चित्र स्पष्ट होऊ लागल्यानंतर, लगेच पहायला मिळाली होती. आधी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि त्यानंतर खुद्द विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत सरकारवर हल्ला चढवला.

(हेही वाचाः पंढरपूरच्या विजयावर काय आहे फडणवीसांचे मत?)

आता ती वेळ आली आहे का?

मागील वर्षभरापासून राज्यात ‘ऑपरेशन लोटस’ येणार अशी चर्चा होती. त्यातच आता राज्यात पोटनिवडणुकीमध्ये देखील भाजपला अपेक्षित यश मिळाले आहे. खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी देखील निवडणुकीच्या प्रचारादरम्यान सरकार बदलायचे माझ्यावर सोडा, मी बघतो. असे वक्तव्य केले होते. त्यामुळे आता खरंच ती वेळ आली आहे का, अशी चर्चा मात्र राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. भाजपच्या काही नेत्यांना याबद्दल विचारले असता, त्यांनी हे सरकार जेव्हा पडायचे तेव्हा पडेल, पण राज्यातली जनता आजही आमच्या बाजूने असल्याचे यावरुन स्पष्ट होत आहे, असे सांगितले. तसेच हे सरकार आम्ही पाडण्याची आवश्यकता नाही तर हे सरकार स्वतःच्या कर्माने पडेल, असा देखील भाजपकडून दावा करण्यात येत आहे.

नेमकं काय म्हणाले होते फडणवीस?

लोक विचारतात एका मतदारसंघाची निवडणूक आहे, काय फरक पडणार, त्याने सरकार बदलतंय का? अरे सरकार बदलायचं माझ्यावर सोडा, मी बघतो. पण या मतदारसंघाची निवडणूक महत्त्वाची आहे या सरकारचा भ्रष्टाचार वाढला आहे, त्यामुळे सरकारला त्यांची जागा दाखवायची असेल तर ही पहिली संधी आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले होते.

(हेही वाचाः पंढरपूरात भाजपला ‘समाधान’! राष्ट्रवादीचा टप्प्यात कार्यक्रम कुणी केला?)

असा लागला निकाल

पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाची निवडणूक अखेरच्या क्षणापर्यंत अटीतटीची राहिली. भाजप उमेदवार समाधान आवताडे यांना एकूण 1 लाख 09 हजार 450 मते मिळाली. तर राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांना 1 लाख 05 हजार 717 मते मिळाली. अवघ्या 3 हजार 733 मतांनी समाधान आवताडे विजयी झाले.

शिक्षक-पदवीधर निवडणुकीचा काढला वचपा

पदवीधर व शिक्षक मतदारसंघाची निवडणूक भाजपने प्रतिष्ठेची केली होती. त्या निवडणुकीमध्ये भाजपचा सुपडा साफ झाला होता. विशेष म्हणजे नागपूर आणि पुणे पदवीधर मतदारसंघामध्ये देखील भाजपला धक्का बसला होता. मात्र आता भाजपने पंढरपूर पोटनिवडणूक जिंकून, महाविकास आघाडीला धक्का दिला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here