भारतरत्न लता मंगेशकर यांच्या पार्थिव देहावर छत्रपती शिवाजी महाराज उद्यान (शिवाजी पार्क) येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यानिमित्ताने भाजपचे आमदार राम कदम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून लता मंगेशकर यांचे स्मारक उभारण्याची मागणी केली आहे.
भारतरत्न लता मंगेशकर यांच्या पार्थिवावर शिवाजी पार्क येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. ज्या ठिकाणी त्या पंचतत्वात विलीन झाल्या, तिथे त्यांचे स्मारक उभारण्यात यावे, या मागणीचा विचार करून तात्काळ स्मारक उभारायला हवे. कारण हे स्थळ जगासाठी प्रेरणा देणारे ठरेल, असे आमदार राम कदम यांनी पत्रात नमूद केले आहे.
शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
आपल्या स्वराने ज्यांची ओळख अजरामर झाली, ज्यांच्या स्वर्गीय सुरांनी अनेक दशकं, अनेक पिढ्यांच्या मनावर अधिराज्य केलं, त्या स्वरसम्राज्ञी, भारतरत्न लता मंगेशकर यांना तिन्ही दलाच्या सैन्यांकडून अखेरची मानवंदना देण्यात आली. अशा रीतीने दीदींवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी लता दीदी यांचे बंधू पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी सायंकाळी ७ वाजून १५ मिनिटांनी लता मंगेशकर यांना मंत्राग्नी दिला. यावेळी लता दीदींच्या लाखो चाहत्यांनी हळहळ व्यक्त केली.