राज्याचे पावसाळी अधिवेशन येत्या 5 आणि 6 जुलै रोजी होत आहे. या फक्त दोन दिवसांच्या अधिवेशनासाठी भाजपने रणनीती आखली आहे. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी भाजप नेत्यांची विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर बैठक पार पडली. यावेळी दोन दिवसीय पावसाळी अधिवेशनात महाविकास आघाडी सरकारला कोणकोणत्या विषयांवर कोंडीत पकडायचे, या मुद्द्यावर प्रामुख्याने चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. त्याचमुळे जरी अधिवेशन दोन दिवसांचे असले, तरी देखील या दोन दिवसांत सरकारची मात्र डोकेदुखी वाढणार आहे.
त्यामुळे हिवाळी अधिवेशनाप्रमाणेच पावसाळी अधिवेशनात दमदार फटकेबाजी करत, भाजप पुन्हा एकदा मैदान मारणार असल्याचा विश्वास भाजप नेत्यांनी व्यक्त केला आहे.
या मुद्द्यांवरुन भाजप घेरणार
राज्यातील वाढती कोरोना रुग्ण संख्या, सचिन वाझे प्रकरण, मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण या सर्व मुद्यांवरुन अधिवेशनाच्या पहिल्याच दिवसापासून विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरण्याच्या तयारीत आहेत. एवढेच नाही तर भाजपने प्रदेश कार्यकारणीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्या चौकशीचा ठराव मांडला आहे. त्यावरुन देखील भाजप अधिवेशनात आक्रमक होणार आहे.
(हेही वाचाः अजित पवार, अनिल परबांच्या सीबीआय चौकशीची अमित शहांकडे मागणी)
काय म्हणाले शेलार?
राज्यासमोर असलेल्या सर्व प्रश्नांना न्याय देण्याबाबत आम्ही रणनीती ठरवल्याचे या बैठकीनंतर आमदार आशिष शेलार यांनी सांगितले. राज्यासमोर अनेक महत्वाचे प्रश्न आहेत. संपूर्ण अधिवेशन झाले असते तर सर्व विषयांना न्याय देता आला असता. पण सरकारने यापेक्षा अजून छोटं अधिवेशन ठेवता येत नाही की काय, म्हणून दोन दिवसांचे अधिवेशन ठेवले आहे, असा टोला शेलार यांनी लगावला. त्याचबरोबर अधिवेशनाच्या दोन दिवसांत शेतकरी, कोरोना ते आरक्षण या मुद्द्यांवर सरकारला प्रश्न विचारण्याचे काम आम्ही करु, असे शेलार म्हणाले.
Join Our WhatsApp Community